‘द एलिफेंट व्हिस्परर्स’वर Oscar मुद्रा…
लॉस एंजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. ऑस्कर हा कलाविश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. आयुष्यात एकदा तरी हा पुरस्कार आपल्या नावे व्हावा, अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूप खास ठरला.
भारताच्या तीन चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालं होतं. त्यापैकी भारताच्या ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ने बेस्ट डाक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांनी मंचावर हा पुरस्कार स्वीकारला. ‘माझी मातृभूमी, भारताला मी हा पुरस्कार समर्पित करत आहे’, असं दिग्दर्शिका कार्तिकी यावेळी म्हणाल्या. हॉलआउट, हाउ डू यू मेजर अ इअर, द मार्था मिचेल इफेक्ट, स्ट्रेंजर ॲट द गेट या इतर शॉर्ट फिल्मशी ‘द एलिफेंट व्हिस्परर्स’ची स्पर्धा होती.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफंट व्हिस्परर’ या माहितीपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस, निर्माते गुणित मोंगा यांच्या सह संपूर्ण चमूचे ‘सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट’ या विभागातील ऑस्कर पारितोषिक मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
अकादमी पुरस्काराकडून याबद्दल केल्या गेलेल्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी ट्विट केले…
“@earthspectrum,@guneetm आणि द एलिफंट व्हिस्परर च्या संपूर्ण चमूचे या सन्मानासाठी हार्दिक अभिनंदन. त्यांच्या या माहितीपटामुळे शाश्वत विकास आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचे तत्व अधोरेखित झाले आहे. #Oscars”
अचित जैन, गुनीत मोंगा निर्मित आणि कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित हा लघुपट 41 मिनिटांचा आहे. या लघुपटात तमिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाची कथा अधोरेखित करण्यात आली आहे. दोन अनाथ हत्तींना हे कुटुंब दत्तक घेतं. विशेष म्हणजे कार्तिकी यांचा दिग्दर्शिक म्हणून हा पहिलाच लघुपट आहे.