‘गोव्याचा आवाज बनेल भारताचा आवाज’
पणजी :
हुकूमशाही, लोकशाहीविरोधी आणि संविधानविरोधी भाजपला कायमचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने नामांकन दिलेल इंडिया आघाडीचे उमेदवार जबाबदारीने आपले कर्तव्य बजावतील. व्हॉईस ऑफ गोव्याचा व्हॉइस ऑफ इंडिया होईल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव पत्रादेवी हुतात्मा स्मारकाजवळ केली.
इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आज गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकात लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.
काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, हळदोणाचे आमदार कार्लोस फरैरा, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर, वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत, टीएमसीचे जयेश शेटगावकर, शिवसेना (यूबीटी)चे जितेश कामत, टीएमसीचे जयेश शेटगांवकर तसेच इतर विरोधी पक्षांचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने आणि परिश्रमाने गोवा मुक्त झाला. या पवित्र भूमीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. गोव्याला फुटीरतावादी शक्तींपासून वाचवण्याची वेळ आली आहे. इंडियाच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याची मी सर्वांना नम्र विनंती करतो, असे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी यावेळी बोलताना सांगीतले.
मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करेन आणि गोव्याच्या हक्कांसाठी लढेन असे मी जाहिर वचन देतो. गोवा आणि गोमंतकीयांच्या रक्षणासाठी मी सदैव तत्पर असेन, असे प्रतिपादन ॲड. रमाकांत खलप यांनी पूढे बोलताना केले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हुकूमशाही भाजप सरकारच्या पराभवाची सुरुवात झाली आहे. म्हादईबाबत भाजपने तडजोड केली आहे. त्यांनी गोव्याचे पर्यावरण नष्ट केले आहे. गोमंतकीय इंडिया उमेदवारांचा विजय निश्चित करतील, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.
आपचे अध्यक्ष अमित पालेकर, शिवसेनेचे जितेश कामत, गोवा फॉरवर्डचे दीपक कलंगुटकर, तृणमूल काँग्रेसचे जयेश शेटगावकर आणि इतरांनीही भाषणे केली आणि काँग्रेसने नामनिर्देशित केलेल्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहिर केला.
दरम्यान, इंडियाच्या सर्व नेत्यांनी पत्रादेवीला बसने एकत्रीत प्रवास केला.