IFFI 2024 : ‘गोवन स्टोरीज’ कोंकणी लघुपटांची थोडक्यात ओळख
गोवन डायरेक्टर कट या विभागात नित्या नावेलकर दिग्दर्शित ‘खारवण’, अक्षय पर्वतकर दिग्दर्शित ‘हँगिंग बाय अ थ्रेड’, साईनाथ उसकईकर दिग्दर्शित ‘गुंतता हृदय हे’ आणि सौजस शेट्ये दिग्दर्शित ‘माई’ यासह गोमंतकीय चार सिनेदिग्दर्शकाचा सहभाग आहे. गोमंतकीय निर्मात्यांच्या चित्रपटांमध्ये जय आमोणकर दिग्दर्शित ‘प्रबोध’, श्रीजीत कर्णवार दिग्दर्शित ‘आइझ मका फाल्या तुका’, निहाल च्यारी आणि आदित्य स्वरूप दिग्दर्शित ‘एडियस’ यांचा समावेश आहे. आदित्य स्वरुप, साईनाथ उसकईकर दिग्दर्शित ‘आसरो-श्रम धामची कथा’, निखिल दीक्षित दिग्दर्शित ‘अ सायलेंट सॅक्रिफाईस : द अनटोल्ड स्टोरी ऑफ गोवा लिबरेशन’, दिलीप बोरकर दिग्दर्शित ‘जीवन योगी : रवींद्र केळेकर’, किशोर अर्जुन दिग्दर्शित ‘एक कप” चा…!’, ज्योती कुंकळकर निर्मित ‘काळखी वाट’ या चित्रपटांचा समावेश आहे.
एक कप च्या..!
‘एक कप च्या…!’ हा कोकणी लघुपट काल इफ्फीत दाखविण्यात आला. तो एका फुटकळ चहाची आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या घडामोडींची एक साधी, सरळ आणि कृष्णधवल गोष्ट सांगतो. आपल्यासोबत आपल्याच घरात असलेल्या स्त्रीच्या बोलण्यावर, काही सांगण्यावर अपवाद वगळता बहुतांश पुरुषांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बंदीच घातलेली असते. तिला अभिव्यक्त होण्याचा अधिकार नसतो. तिला देखील बोलू दिले पाहिजे, काही हवे नको ते सांगू दिले पाहिजे, हेच त्यांना समजले नाही. तिच्या साध्या चहा पिण्याच्या सवयीवर देखील जर पुरुषाने स्वतःचा हक्क दाखवला तर काय होईल? हेच या लघुपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक किशोर अर्जुन यांनी चित्रित केले आहे. सक्रिय पत्रकारितेतून सिनेनिर्मितीमध्ये आलेल्या किशोर अर्जुन यांचा हा लेखक/दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच लघुपट आहे.
लेखक : दिग्दर्शक : किशोर अर्जुन, निर्मिती : सहित स्टुडिओ, गोवा. मुख्य कलाकार : रावी किशोर, अभिषेक आनंद
अ सायलेंट सॅक्रिफाईस
हा स्वातंत्रसैनिक स्व. मोहनदादा रानडे यांच्यावरील लघुपट इफ्फीत दाखवण्यात येणार आहे. गोवा विभागात या लघुपटाची निवड झाली असून निखिल दीक्षित यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार-संपादक वामन प्रभू हे या लघुपटाचे निर्माता आहेत. गोवा मुक्ती संग्रामातील मोहनदादा रानडे यांचे योगदान दाखवणे हा या लघुपट निर्मिती मागील मुख्य उद्देश. निखिल दीक्षित एक दशकाहून अधिक काळ दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता म्हणून कार्यरत आहेत. चरित्रात्मक शैली, फिक्शन, नॉन-फिक्शन आणि डॉक्यु-फिक्शन हे त्यांच्या कामाचे विशेषपण म्हणता येईल.
कधी व कोठे प्रदर्शन : २५ नोव्हेंबर, वेळ : सकाळी १० ते ११, आयनॉक्स स्क्रीन ३, पणजी. दिग्दर्शक : निखिल दीक्षित, निर्माता : वामन प्रभू, संगीत : आभा सौमित्र, संकलन : पंकज भारतलता.
जीवनयोगी रवींद्र केळेकर
कोकणीतील प्रसिद्ध लेखक दिलीप बोरकर यांचा हा महत्वाकांक्षी लघुपट. रवींद्र केळेकर हेच या लघुपटाचे मुख्य नायक. रवींद्रबाब यांच्याभोवती संपूर्ण लघुपट फिरतो. त्यांचे गोव्यासाठी आणि कोकणीसाठी असलेले योगदान या लघुपटात चित्रित करण्यात आले आहे. एका लेखकाने आपल्या गुरूला वाहिलेली आदरांजली म्हणजे ‘जीवनयोगी रवींद्र केळेकार’ हा लघुपट. ‘गोवा प्रीमिअर’ या विभागात या लघुपटाची निवड करण्यात आली आहे. रवींद्रबाब केळेकर यांचे दुर्मीळ छायाचित्रण हे या लघुपटाचे वेगळेपण आहे.
कधी व कोठे प्रदर्शन : २५ नोव्हेंबर, वेळ : सकाळी ११ वाजता, आयनॉक्स स्क्रीन ३ पणजी. कथा-पटकथा, निर्माता-दिग्दर्शक : दिलीप बोरकर, संगीत : मुकेश घाटवळ, छायाचित्रण दिग्दर्शन : साईनाथ परब.
काळखी वाट
ड्रग्सचा समाजाला पडलेला विळखा एका कौटुंबिक कथानकाच्या माध्यमातून यात मांडण्यात आला आहे. भारत हा तरुणांचा देश आहे आणि त्यांच्याकडे अचाट प्रतिभा आहे. त्याला योग्य वाट देण्याची गरज आहे. मात्र ड्रग्ज नावाचा राक्षस समाजाला पोखरतो आहे. ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर पडल्यास युवक अनेक चांगली कामे करु शकतात. हा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न निर्मात्या ज्योती कुंकळकर यांनी केला आहे. संवेदनशील लेखिका ज्योती कुंकळकर यांनी या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहे तर या माहितीपटाच्या निर्मात्याही आहेत. यात गोव्यातील आघाडीचे २० कलाकार असून लेखिका संपदा कुंकळकर या सहनिर्मात्या आहेत.
कधी व कोठे प्रदर्शन : २७ नोव्हेंबर, वेळ : सकाळी ९.१५ वा., आयनॉक्स स्क्रीन ३, पणजी. कथा-पटकथा-संवाद व निर्माती : ज्योती कुंकळकर, दिग्दर्शन : गिरीश राणे.
‘गुंतता हृदय हे’ आणि ‘आसरो’
गोमंतकीय युवा दिग्दर्शक साईनाथ उसकईकर यांच्या ”गुंतता हृदय हे’ आणि ‘आसरो’ या दोन चित्रपटांचा यावर्षीच्या इफ्फीमध्ये निवड झाली आहे. तो भारतीय शास्त्रीय संगीत आणि कौटुंबिक मूल्ये यावर आधारित आहे. हा चित्रपट मानवी भावनांच्या सांस्कृतिक परिभाषेत खोलवर रुजलेल्या वारशाचा शोध घेतो. शेवटचे श्वास मोजणारा यशस्वी कलाकार त्याच्या भूतकाळात गुंतलेला असतो. संगीता सोबत प्रत्येक क्षण जगताना त्याला एक वेगळीच वाट गवसते आणि पुढच्या पिढीसाठी तो नवी वाट तयार करतो. ”आसरो’ हा लघुपट काणकोणमधील आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळवून देण्याचे काम करत असलेल्या ‘श्रम-धाम’ या योजनेवर आधारित आहे.
कधी व कोठे प्रदर्शन : आसरो : २५ नोव्हेंबर, वेळ : संध्या ५.४५ वा. आयनॉक्स स्क्रिन ४, पणजी. गुंतता हृदय हे : २७ नोव्हेंबर, वेळ : सकाळी ९.१५ वा., आयनॉक्स स्क्रिन ३, पणजी.
माई
कांचन आनंद कुडतरकर यांच्या नातवाने त्यांच्यावर लघुपट करायचं ठरवलं आणि ‘माई’ या लघुपटाची निर्मिती झाली. सौजस शेट्ये निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट त्यांनी त्यांच्या आजीला अर्पण केला आहे. महोत्सवातील त्यांचा हा पहिलाच लघुपट आहे. आजीचं दैनंदिन जगणं, आल्या गेलेल्यांशी गप्पा मारणं हे सगळं चित्रित करण्यात आले आहे. आजीच्या छोट्या छोट्या गोष्टी चित्रित करून ठेवण्याच्या छंदातून या लघुपटाची निर्मिती झाली.
कधी व कोठे प्रदर्शन : २५ नोव्हेंबर. वेळ : संध्याकाळी ५.४५ वा. आयनॉक्स स्क्रीन ४, पणजी.
एडियस
निहाल च्यारी आणि आदित्य स्वरूप दिग्दर्शित ‘एडियस’ हा लघुपट गोवा बाहेरच्या-आतल्या व्यक्तीच्या कोंडीवर विचार करायला लावणारा आहे. आदित्य मूळचा बिहारचा. त्याचं शिक्षण गोव्यात झालं. गोव्यात एक बाहेरचा माणूस म्हणून त्याला आलेला, येत असलेला अनुभव त्याने या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक आणि स्थलांतरित यांच्यातील संघर्ष, एकमेकांवर अवलंबून असलेलं व्यावहारिक नातं या लघुपटाच्या माध्यमातून चित्रित करण्यात आले आहे.
कधी व कोठे प्रदर्शन : २५ नोव्हेंबर, वेळ : सकाळी ११ वाजता, आयनॉक्स स्क्रीन ३, पणजी.