कशी झाली सलमानला ‘टायगर ३’ च्या सेटवर दुखापत..?
सलमान खान हा निर्विवादपणे भारतीय चित्रपटसृष्टीतील बड्या अॅक्शन सुपरस्टार्सपैकी एक आहे. या सुपरस्टारने गेल्या दशकभरात सातत्याने आम लोकांच्या पसंतीला उतरतील अशा मसाला मारधाडपटांतून आपले स्वत:चे ‘अॅक्शन हिरो’ म्हणून स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटात सलमानने साकारलेले अॅक्शन सीक्वेन्स, पडद्यावर जनतेला रंजक वाटत असले तरी हे सारे प्रसंग तितकेच जोखमीचे आणि धाडसी आहेत.
आपल्याला ठाऊक आहे की, सलमान खान त्याचा बहुप्रतीक्षित अॅक्शन चित्रपट ‘टायगर ३’ प्रदर्शित होण्याची जोशात तयारी करत आहे. हा चित्रपट ऐन दिवाळीत, येत्या १२ नोव्हेंबर रोजी जगभरातील सिनेगृहात दाखल होत आहे. याच चित्रपटातील एका महत्त्वाच्या अॅक्शन सीनचे चित्रीकरण करताना सलमानला दुखापत झाली होती.
‘टायगर ३’ या अॅक्शनने पुरेपूर भरलेल्या साहसपटात अनेक चित्तथरारक अॅक्शन सीक्वेन्स आहेत, उदाहरणार्थ- बाइक आणि कारच्या पाठलागाची मालिका! या चित्रपटातील एक महत्त्वाचा सीन आहे, तो छतावरचा. चंदेरी पडद्यावर हा सीन वास्तवातला, खराखुरा वाटावा, याकरता मोठी जोखीम पत्करत, स्वत: सलमानने तो सीन साकारला आहे. या प्रसंगाचे चित्रीकरण करत असताना सलमान जखमी झाला होता. या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे, ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरील दे मार अॅक्शन सीक्वेन्स! या सर्व प्रसंगांचे चित्रीकरण कलाकारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत पार पाडण्यात आले खरे, परंतु एका अॅक्शन सीक्वेन्स दरम्यान सलमानच्या खांद्याला दुखापत झाली होती.
सलमान खान आणि निर्मात्यांनी ‘टायगर ३’ हा वर्षातील सर्वात मोठा धमाकेदार चित्रपट बनावा, असे उद्दिष्ट बाळगले आणि कोणतीही कसर राहू नये याकरता, निर्मात्यांनी या चित्रपटात काही अप्रतिम, उच्च-श्रेणीचे आणि यापूर्वी सिनेरसिकांनी कधीही न पाहिले नाहीत, असे अॅक्शन सीक्वेन्स समाविष्ट केले आहेत. या अॅक्शन प्रसंगांना चित्रपटात सर्वोच्च प्राधान्य मिळाले आहे. चित्रपट रसिकांना आणि प्रामुख्याने अॅक्शन चित्रपटाचे दर्दी असलेल्या जनतेला त्यांनी यापूर्वी कधीही न पाहिलेला चित्रपट अनुभव देण्यासाठी या चित्रपटात बड्या अॅक्शन कोरिओग्राफर्सची वर्णी लागली आहे.
चित्रपटाचे आगाऊ बुकिंग अलीकडेच सुरू झाले असून, चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचा कल ध्यानात घेतला तर त्यातून या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये जी कमालीची सकारात्मकता आहे, ती दिसून येते. कोणत्याही जाहिरातीशिवाय, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पाच दिवसांआधीची या चित्रपटाची आगाऊ कमाई ७.५ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे आणि बॉक्स ऑफिसवर आजवरचे कितीतरी रेकॉर्ड्स ब्रेक करणारी प्रारंभीची धुवाँधार बुकिंग घेण्यास ‘टायगर ३’ चित्रपट पुरता सज्ज आहे.
‘टायगर ३’ हा यापूर्वी दाखल झालेल्या टायगर चित्रपटांमधील तिसरा चित्रपट आहे, ज्यामध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत सुपरस्टार सलमान अस्सल गुप्तहेर टायगर बनून पुन्हा एकदा सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. मनीष शर्मा दिग्दर्शित हा अॅक्शन साहसपट १२ नोव्हेंबरला सिनेमागृहांत प्रदर्शित होईल.