google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

”या’मुळे मिळेल विधवा भेदभाव बंदी कायद्याला प्रेरणा’

मडगाव :

गोव्यातील एक विधवा उषा नाईक यांनी त्यांची मुलगी डॉ. गौतमी व डॉ. प्रथमेश यांच्या विवाहाचे विधी स्वतः करुन एक नवीन पायंडा सुरू केला आहे. या अत्यंत स्तुत्य घटनेला पाठिंबा देणाऱ्या नाईक-डिचोलकर कुटुंबियांचे अभिनंदन. या ऐतिहासीक क्षणाने विधवा भेदभावावर बंदी आणणारा कायदा आणण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी मी आशा बाळगतो असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.


गोव्यातील दोन कुटुंबांनी घेतलेल्या विधवा महिलेला समान वागणूक देण्याच्या पुढाकाराचे स्वागत करताना, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव प्रत्येक महिलांना आमच्या चालीरीती आणि विधींचा भाग होऊ द्या अशी भावना व्यक्त केली आहे. याच विषयाशी जोडलेला 31 मार्च 2023 रोजी आठव्या गोवा विधानसभेच्या चौथ्या अधिवेशनात विस्तृत चर्चा झालेल्या “विधवा भेदभावाची अन्यायकारक प्रथा आणि अंत्यसंस्काराच्या वेळी स्त्री-पुरुषांच्या प्रेतांची विकृती” या विषयावरील त्यांच्या खाजगी सदस्य ठरावाचाही संदर्भ युरी आलेमाव यांनी दिला.


जानेवारी 2023 च्या अधिवेशनात मला महिला व बालविकास मंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभेच्या पुढील अधिवेशनात विधवा भेदभाव प्रथेला बंदी घालणारा कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत त्यावर काहीही हालचाल झालेली नाही, असे युरी आलेमाव यांनी सांगितले. डॉ. गौतमी या तरुण मुलीने उचललेल्या पाऊलाने विधानसभेच्या येत्या अधिवेशनात दोन पाऊले पूढे टाकत कायदा आणण्यासाठी सरकारला प्रेरणा मिळेल, असे युरी आलेमाव म्हणाले.


संपूर्ण नाईक-डिचोलकर परिवार देशातील प्रत्येक नागरिकाकडून अभिनंदनास पात्र आहे. या भावनीक स्पर्शाच्या पाऊलाने सर्वांना आनंदाचा प्रसार करण्याचा आणि सर्वांशी दयाळूपणे वागण्याचा संदेश दिला आहे. आपण सर्वांनी हा क्षण सकारात्मकतेने जपणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

विधवांना विवाहित महिलांच्या बरोबरीने वागणूक मिळावी या मागणीसाठी मी खाजगी सदस्य ठराव मांडला होता. माझ्या ठरावाला विधानसभेतील माझ्या महिला सहकारी डॉ. देविया राणे, डिलायला लोबो आणि इतर आमदारांनी पाठिंबा दिला. गोव्यातील काही पंचायतींनी विधवा भेदभावाविरुद्ध ठरावही पारित केले आहेत, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.


डॉ. गौतमी आणि डॉ. प्रथमेश यांच्या विवाहसोहळ्याने इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. माझ्या विधवा भेदभाव प्रथेविरुद्ध कायदा करण्याच्या मागणीच्या खासगी ठरावालाही बळ मिळाले आहे. आपल्या मातांचा सन्मान करणाऱ्या तरुण जोडप्यांकडून सरकार धडा घेईल आणि विधवांच्या सक्षमीकरणासाठी कायदा आणेल अशी आशा युरी आलेमाव यांनी व्यक्त केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!