
‘या’ दिवशी होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा?
नवी दिल्ली :
केंद्रीय निवडणूक आयोगाचा जम्मू-काश्मीरचा पाहणी दौरा झाल्यानंतर १४ वा १५ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आयोगाने बहुसंख्य राज्यांचा निवडणूकपूर्व आढावा घेतला असून सोमवार ते बुधवार (११ ते १३ मार्च) या तीन दिवसांत तीनही निवडणूक आयुक्त जम्मू विभाग तसेच काश्मीर खोऱ्याला भेट देतील.
केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जम्मू व काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये संपूर्ण माहिती पुरवलेली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या तपशिलाच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोग जम्मू व काश्मीर या दोन्ही विभागांचा आढावा घेईल. सर्वोच्च न्यायालयाने जम्मू व काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाला आढावा घेण्याचे आदेश दिले होते. आयोगाला ३० सप्टेंपर्यंत विधानसभेची निवडणूक घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीचीही तयारी केली जात असल्याचे समजते. दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्यासंदर्भात आयोगाने अजून निर्णय घेतलेला नाही. मात्र, येत्या आठवडय़ातील आयोगाच्या भेटीमध्ये दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याइतके अनुकूल वातावरण आहे का, याची चाचपणी केली जाणार आहे.