
‘कुंकळ्ळी बायपाससाठी घरे वाचवणे महत्वाचे’
मडगाव :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुंकळ्ळी बायपाससाठी ₹310.92 कोटी मंजूर केलेल्या घोषणेचे स्वागत. मी रस्ते वाहतूक मंत्रालयाला आवाहन करतो की बायपासच्या संरेखनामुळे विद्यमान निवासी घरांचे कोणतेही नुकसान होणार नाही आणि पर्यावरणाची कोणतीही मोठी हानी होणार नाही याची दखल घेणे महत्वाचे आहे, असे कुंकळ्ळीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
कुंकळ्ळी येथील वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या आहे. मुख्य बाजारपेठेतून अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने बाजारपेठेत येणाऱ्या पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण होत आहे. सध्याच्या महामार्गापासून काही मीटर अंतरावर विविध शाळा आहेत आणि वाहनांच्या रहदारीमुळे शालेय मुलांनाही गंभीर धोका निर्माण होतो, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
मला आशा आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच रस्ते वाहतूक मंत्रालय स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊनच बायपासचे नवीन संरेखन तयार करेल. बायपासमुळे निवासी घरांचे कोणत्याही किंमतीत नुकसान होणार नाही याची मी काळजी मी घेईन, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.
सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊनच दांडेवाडो ते उसकिणी आर्क या महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम हातात घ्यावे. सदर महामार्गाच्या बाजूला असलेल्या घरांना कोणताही धोका होता कामा नये याची दखल सरकारने घेणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
बायपास तसेच महामार्ग विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेवर मी बारकाईने लक्ष ठेवीन आणि स्थानिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेईन, असे आश्वासन युरी आलेमाव यांनी दिले आहे.
…