‘राष्ट्रपतींच्या भेटीपूर्वी काणकोणचे रस्ते दुरुस्त करा, अन्यथा…’
काणकोण:
लोकोत्सवासाठी काणकोणला येणाऱ्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीपूर्वी येथील सर्व रस्ते दुरुस्त करण्याची गरज जनसेना वॉरियर्स आणि काणकोण काँग्रेस परिवाराने व्यक्त केली आहे आणि काम सुरू करण्यासाठी 7 दिवसांची अवधी दिली आहे, असे न झाल्यास पुढील कृती करु असा इशारा त्यांनी दिला आहे.
“काणकोण मधील सर्व रस्ते, ज्यात एनएच 66, मुख्य जिल्हा रस्ते, ग्रामीण, स्थानिक रस्ते, अंतर्गत पर्यटन रस्ते आणि समुद्रकिनाऱ्या पर्यंत जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
काणकोणच्या लोकोत्सवासाठी राष्ट्रपतींच्या नियोजित भेटीची तारीख जवळ येत आहे. काणकोणमधील सर्व रस्ते दुरुस्त करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी संबंधित विभागांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान केंद्र सरकारचे अनेक उच्चपदस्थ अधिकारी गोव्यात येणार असून अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पत्रकार भारताच्या माननीय राष्ट्रपतींसोबत येणार असल्याचे पुढे म्हटले आहे.
अशा परिस्थितीत, काणकोण येथील रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे आपल्या काणकोणाबद्दल नकारात्मक प्रचार होईल आणि त्याचा येथील पर्यटन व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे काणकोणचा अभिमान व प्रतिष्ठा राखण्यासाठी एनएच 66, प्रमुख जिल्हा रस्ते, ग्रामीण/स्थानिक रस्त्यांसह सर्व रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की; (1) पोळे, काणकोण ते मडगाव पर्यंतचे हॉट मिक्सिंगचे काम लवकरात लवकर सुरू करा जे अद्याप अपूर्ण आहे आणि निविदा दस्तऐवजात नमूद केल्याप्रमाणे सर्व बाबींमध्ये काम पूर्ण करा; (२) काणकोणमधील सर्व प्रमुख जिल्हा रस्ते, ग्रामीण/स्थानिक आणि अंतर्गत पर्यटन आणि समुद्र किनारी जाणारे रस्ते तात्काळ दुरूस्ती करणे आणि हॉट मिक्सिग काम हाती घ्या आणि काम वेळेत, योग्यरित्या पूर्ण करा; (३) “पर्तगाळ ते आमोणे”, (लोकोत्सव स्थळ) रस्त्याची दुरुस्ती आणि हॉट मिक्स काम युद्धपातळीवर हाती घ्या.; (४) भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या आगमनाच्या वेळी होणारे अपघात/वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करमल घाटातील तीव्र वळणांची दुरुस्ती करण्यात यावी; (५) काणकोण येथील दैनंदिन अपघात लक्षात घेऊन, भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या काणकोण दौऱ्यात कोणतीही घटना घडल्यास मोठी क्रेन आणि इतर पायाभूत सुविधांची आवश्यक व्यवस्था करा.
पुढच्या 7 दिवसांत म्हणजे 15 नोव्हेंबर पर्यंत दुरुस्ती/हॉट मिक्सचे काम सुरू करण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्यास काणकोणच्या नावाचे रक्षण करण्यासाठी व अधिकाऱ्यांना रस्त्यांची दुरुस्ती करण्यास भाग पाडण्यासाठी जनसेना वॉरियर्स रस्त्यावर उतरतील, असा इशाराही देण्यात आला आहे.