junior mehmood: प्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर मेहमुद यांचं निधन
प्रसिद्ध अभिनेते ज्युनिअर मेहमुद (junior mehmood) यांचं कर्करोगाने निधन झालं आहे. त्यांची प्रकृती खालावल्याच्या बातम्या समोर आल्याच होत्या. अभिनेते सचिन पिळगावकर आणि जितेंद्र यांच्यासह ज्युनिअर मेहमुद यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. सचिन आणि ज्युनिअर मेहमुद हे बालपणीचे मित्र होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सचिन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सचिन पिळगावकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. आज ज्युनिअर मेहमुद यांची प्राणज्योत मालवली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार जुहू येथील कब्रस्तानात ज्युनिअर मेहमुद (junior mehmood) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुलं, सुना आणि एक नातू असा परिवार आहे. नईम सय्यद हे ज्युनियर मेहमुद या नावाने प्रसिद्ध होते. त्यांना ‘ज्युनियर मेहमुद’ हे नाव त्यांना मेहमुद अली यांनी दिले होते. त्यांनी ७ वेगवेगळ्या भाषांमधील तब्बल २६५ चित्रपटांमध्ये काम केलं असून ६ मराठी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं होतं.
ज्युनियर मेहमुद (junior mehmood) आणि सचिन पिळगावकर यांनी बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. या दोघांनी ‘बचपन’, ‘गीत गाता चल’ आणि ‘ब्रह्मचारी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ज्युनियर मेहमुद यांनी जितेंद्रबरोबर ‘सुहाग रात’, ‘कारवाँ’, ‘सदा सुहागन’सह आणखी काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
ज्युनिअर मेहमुद (junior mehmood) यांची प्रकृती काही दिवसांपासून खूपच बिघडली होती. त्यांना कर्करोग झाला होता. ४० दिवसांपेक्षा जास्त दिवस ते जिवंत राहणार नाहीत असं डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. जॉनी लीवर यांनी त्यांना मदत केली होती. तसंच सचिन पिळगावकर यांनीही त्यांची भेट घेतली होती.
ज्युनिअर मेहमुद हे मागच्या दोन महिन्यांपासून आजारी होते. त्यांचं वजन कमी होऊ लागलं तेव्हा त्यांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. नैनिहाल हा त्यांचा पहिला सिनेमा होता. परिवार, ब्रह्मचारी, फरिश्ता, प्यार ही प्यार, कटी पतंग, आन मिलो सजना, कर्ज चुकाना है.. या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.