‘काळीज उसवलां’मध्ये नाही आत्मपौढीला स्थान : भास्कर नायक
पणजी :
‘काळीज उसवलां’ हे जरी लेखकाने निबंधपर पुस्तक म्हटले असले, तरी बालवयातील आत्मपर आठवणी आहेत. मात्र या आठवणींमध्ये कुठेही आत्मपौढी नाही हे या पुस्तकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन गोव्याचे माजी उच्च शिक्षण संचालक भास्कर नायक यांनी केले. ‘काळीज उसवलां’ पुस्तकाच्या मराठी अनुवादित आवृत्तीचे प्रकाशन मुंबई येथे नुकतेच झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर मूळ पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध कोंकणी साहित्यिक उदय म्हांबरो, मराठी अनुवादिका पौर्णिमा केरकर, आम्ही गोंयकार या आयोजक संस्थेचे अध्यक्ष मोहन संझगिरी, दुर्गादास परब यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबईतील विलेपार्ले येथे गोमंतक सेवा संघ सभागृहात आम्ही गोंयकार संस्थेच्यावतीने गोवा मुक्तीदिनाचे औचित्य साधत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहित प्रकाशनाच्यावतीने उदय म्हांबरो यांचे काळीज उसवलां हे कोंकणी, मल्याळम भाषेत आणि कन्नड-कोंकणी लिपीत गाजलेले पुस्तक आता मराठीमध्ये देखील प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. विद्या प्रभूदेसाई यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. या कार्यक्रमावेळी गोव्याच्या मुक्तिसंग्रामासाठी लढलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा संस्थेच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला.
विविध भाषेतील लेखक, वाचक या आणि समीक्षक या सगळ्यांनी ‘काळीज उसवलां’ या पुस्तकाला भरभरून प्रेम दिले आहे. आणि या पुस्तकावर मोठ्या प्रमाणात लिहिले गेले आहे. ही एक महत्त्वाची बाब असून, कोंकणी साहित्यामध्ये अशा प्रकारची घटना ही विरळा बाब असल्याचेही भास्कर नायक यांनी यावेळी विशेष नमूद केले.
यावेळी काळीज उसवलां पुस्तकाचे मूळ लेखक उदय म्हांबरो यांची लेखिका दिक्षा प्रभू यांनी सदर पुस्तकाच्या अनुषंगाने सविस्तर मुलाखत घेतली. पुस्तकातील आठवणी, बालपण आणि या सगळ्यात मधल्या काळात झालेले विविध बदल यावर या मुलाखतीमध्ये प्रामुख्याने भर देण्यात आला. त्याचप्रमाणे कोंकणी साहित्य आणि वाचन संस्कृतीवरदेखील यावेळी विशेष प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप ‘सुरिले गोंयकार’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाने करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका केरकर यांनी तर ‘आमी गोंयकार’ संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. अस्मिता हेगडे यांनी आभार मानले.



