Karanataka election 2023 : ‘हे’ नाव येऊ शकेल मुख्यमंत्रीपदासाठी अनपेक्षितपणे पुढे…
Karnataka Election Result :
कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून आता मुख्यमंत्रीपदी कोण होणार याकडे लक्ष लागलं आहे. कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. सुरुवातीला फक्त डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असताना आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव अचानक पुढे आलं आहे.
निवडणुकीच्या आधी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. त्यामुळे या निवडणुका माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता बहुमत आल्यानंतर या दोघांपैकीच कोणीतरी मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण आता अचानक या शर्यतीमध्ये आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील स्पर्धेत आले आहेत. तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते जी परमेश्वर यांचं नावदेखील चर्चेत आहे.
दुसरीकडे बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतिश जारकीहोळी यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचंही नाव अनपेक्षितपणे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मल्लिकार्जुन खरगे हे राष्ट्रीय अध्यक्ष असून ते काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतले नेते आहेत. त्यामुळे त्यांनाही पसंती मिळू शकते.