केतकी चितळेला सुनावली पोलीस कोठडी
ठाणे:
अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. त्यानंतर तिच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला ठाणे पोलिसांनी अटक (Ketaki Chitale Arrested) केली असून आज ठाणे न्यायालयात हजर केले आहे. याप्रकरणी न्यायालयाने केतकीला 18 मेपर्यंत पोलिस कोठडी (Ketaki Chitale Police Custody) सुनावली आहे.
वकील नितीन भावे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर लिहिलेल्या वादग्रस्त कवितेतील ओळी केतकी चितळेने सोशल मीडियावरून शेअर केल्या होत्या. तिने अत्यंत खालच्या पातळीवर पवारांवर टीका केली आहे. पवार ब्राह्मणांच्या विरोधात असल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी ठाण्यातील कळवा पोलिस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी शनिवारी सायंकाळी केतकीला अटक केली.
दरम्यान, केतकीला अटक करताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आधीच ठाणे पोलिस ठाण्यासमोर जमले होते. कार्यकर्त्यांनी कळंबोली पोलिस ठाण्याबाहेर तिच्यावर अंडी आणि शाईफेक केली. तसेच तिच्याविरोधात घोषणाबाजी केली. केतकीला आज न्यायालयात हजर केले आहे. यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला आहे. कारण, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे न्यायालयाबाहेर निदर्शने सुरू आहेत. केतकीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत.