
छ. शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य तर आहेतच, पण आज जेव्हा आम्ही प्रशासन व्यवहार करत असताना, शिवाजी महाराजांनी त्या काळात केलेल्या एकूण राज्यकारभाराचा अभ्यास खूपच उपयोगी पडत असतो. त्यामुळे चारुदत्त चिखले यांनी शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व ‘शिवायन’ या कथा काव्य स्वरूपात आणून जुन्या आणि नव्या पिढीपर्यंत शिवाजी महाराज पुन्हा एकदा प्रभावीपणे पोहोचवले आहेत, असे प्रतिपादन पुण्याचे कस्टम आणि अप्रत्यक्ष कर प्रधान आयुक्त यशोधन वनगे यांनी केले. सहित प्रकाशित आणि चारुदत्त चिखले लिखित ‘शिवायन’चे प्रकाशन पेण येथील महात्मा गांधी वाचन मंदिर येथे केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी मंचावर लेखकासह प्रकाशक व्यवस्थापक सागर शिंदे, तान्हाजी मालुसरे यांच्या १२ व्या वंशज डॉ. शितल मालुसरे, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलीमा पाटील, पेणच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, समाजसेविका डॉ.समीधा गांधी, महात्मा गांधी वाचनालय संस्थेच्या उपाध्यक्षा सपना पाटील, पेणचे माजी नगराध्यक्ष गुरूनाथ मांजरेकर, शांता भावे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र साध्या, सोप्या व रंजक पद्धतीने, गीत रामायणासारख्या कथा व काव्यगीते या आकृतिबंधात सादर व्हावे अशी फार वर्षांपासून तीव्र इच्छा असल्यानेच छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र ’शिवायन’चे लेखन केल्याचे चारुदत्त चिखले यांनी सांगत, महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवरायांचा आदर्श सर्वच पातळ्यांवर अगिकारणे आवश्यक असल्याचेही भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
शिवरायांचे संपूर्ण चरित्र ’शिवायन’ ज्या प्रकारे काव्यात मांडले आहे तसे मांडणे ही खूपच अवघड गोष्ट असल्याचे शीतल मालुसरे यांनी नमूद करून, हे शिवायन अत्यंत रोमांचकारी असून ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असेही सांगितले. समिधा गांधी यांनीही जिजाऊसाहेबांचा आदर्श सर्वच मातांना प्रेरणादायी असल्याचे नमूद करून वीर, करूण रसाने भरलेले हे शिवायन वाचताना आपण खूपच भारावून गेल्याचे सांगितले.
सहितच्या सागर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ’शिवायन’ मधील काही भागाचे मोनिका ठाकूर यांनी अभिवाचन केले. तसेच काही गीतांचे संतोष पाटील यांनी लयबद्ध सादरीकरण केले.