पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 6 फेब्रुवारी रोजीच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप लोकसभा निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघात भाजपने गेल्या वर्षभरात संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष दिले आहे.
हे काम व्यवस्थित व्हावे यासाठी गोव्याशी संबंधित नसलेल्या केंद्रीय मंत्र्यांकडे त्याची जबाबदारी देण्यात आली होती.
भारतीय ऊर्जा सप्ताहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान गोव्यात येणार असले तरी ‘विकसित भारत’ या यात्रेच्या निमित्ताने त्यांचा मडगावात जाहीर कार्यक्रम सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.
यामुळेच दक्षिण गोव्यातील लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा बिगुल पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फुंकण्याची तयारी भाजपने चालवली असल्याचे दिसून येत आहे.
मडगावच्या बसस्थानकावर होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप दक्षिण गोव्यातील आपले शक्तिप्रदर्शन करणार आहे. हा सरकारी कार्यक्रम असला तरी याला राज्यभरातील भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांना या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या योजनांतर्गत लाभार्थीही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सन्मानित केले जातील.
राज्य व केंद्र सरकारने गेल्या दशकभरात केलेल्या कामाचे प्रदर्शन यानिमित्ताने सर्वांसमोर व्हावे, असे नियोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा एका उच्चस्तरीय बैठकीत बुधवारी घेतला.