गोवा

नव्या वर्षात गोव्याच्या संरक्षणाचा मडगांवचो आवाजचा संकल्प

मडगांव – मडगांवचो आवाजने गोमंतकीयांच्या अस्मितेचा सांभाळ करण्यासाठी वचनबद्ध असलेल्यांसोबत ठामपणे उभे राहण्याचा आणि भावी पिढ्यांसाठी गोव्याचे रक्षण करण्यासाठी होणाऱ्या सामूहिक प्रयत्नात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला आहे. गोव्याची जमीन, पर्यावरण, गावे आणि लोकांचे संरक्षण एकजुटीने, सतर्कतेने व नैतिक धैर्याने करण्याची आपली बांधिलकी मडगांवचो आवाजने पुनः अधोरेखित केली आहे.

अलहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. फर्दिनो रिबेलो यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, युवा नेते प्रभव नायक यांनी आज न्या. रिबेलो यांची भेट घेऊन मडगांवचो आवाजच्या वतीने त्यांना एक प्रतिज्ञापत्र सादर केले. सदर पत्रात अनियंत्रित व विध्वंसक विकासाविरोधात गोमंतकीयांनी एकत्र येण्याच्या न्यायमूर्ती रिबेलो यांच्या हाकेला पूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.

मडगांवचो आवाजने नमूद केले की न्या. रिबेलो यांचे विधान राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले असून त्यावर प्रभावी संपादकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गोव्याला भेडसावणाऱ्या पर्यावरणीय संकटाचा न्यायमूर्ती रिबेलो यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. पर्यावरणीय समतोल आणि गावजीवनाच्या झपाट्याने होणाऱ्या ऱ्हासाचे साक्षीदार असलेल्या नागरिकांच्या भावना अचूकपणे त्यांच्या आर्त हाकेत प्रतिबिंबित होत आहेत असे मडगांवचो आवाजचे प्रभव नायक यांनी म्हटले आहे.

आज सादर करण्यात आलेल्या ठरावात मडगावचो आवाजतर्फे नमूद करण्यात आले आहे की न्या. रिबेलो यांचे शब्द केवळ एखाद्या एका बातमीवरील प्रतिक्रिया नसून, त्यामागे वेदना, चिंता आणि गोव्याच्या डोंगररांगा, जंगले, नद्या, समुद्रकिनारे आणि गावे अनियंत्रित बांधकाम व शोषणापासून वाचवण्याची खोल जबाबदारीची जाणीव आहे.

मडगांवचो आवाजने ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, आपत्ती व सुरक्षा व्यवस्थेचे अपयश, मृत्यूचे सापळे ठरलेले रस्ते, अपुरी आरोग्यसेवा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि वाढती गुन्हेगारी या गंभीर मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवला असल्याचे न्यायमूर्ती रिबेलो यांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अधोरेखित केले आहे. हे सर्व प्रश्न वेगवेगळे असले तरी, लोकहितापेक्षा नफा व फायदा आणि राज्याचे हित डावलून तथाकथित विकासाला प्राधान्य देणाऱ्या कारभारातूनच उद्भवले आहेत, असे सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर उभा असलेला गोवा पाहता, २०२६ हे वर्ष गोव्याच्या पर्यावरण, सामाजिक संरचना आणि अस्मितेच्या रक्षणासाठी जनआंदोलनाचे वर्ष ठरावे, असा ठाम संकल्प माडगांवचो आवाजने सदर प्रतिज्ञापत्रात व्यक्त केला असून, सामूहिक कृती, जबाबदारी आणि अढळ नैतिक धैर्याच्या माध्यमातून हा लढा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!