म्हादईवर गोव्याचाच हक्क : कन्नड महासंघ
पणजी :
म्हादईवर गोव्याचा हक्क आहे, नैसर्गिकस्रोत जल प्रवाह उलट्या दिशेने वळविणे चुकीचे आहे, असे मत अखिल गोवा कन्नड महासंघातर्फे हनुमंतप्पा रेड्डी यांनी व्यक्त केले.
कन्नड महासंघाकडून मिळालेल्या माहितीनुसार नोकरीधंद्यानिमित्त गोव्यात वास्तव्य करणाऱ्या कन्नडिगांची संख्या किमान पाच लाख असण्याची शक्यता आहे. डिचोलीत जवळपास १५ हजार कन्नड लोक वास्तव्य करुन आहेत. ‘कर्मभूमी कन्नड संघ’ या नावाची संघटनाही गोव्यात कार्यरत आहे.. कर्नाटक सरकारच्या सहकार्याने गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी डिचोलीत कन्नड संस्कृती महोत्सवही आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कन्नडीगांचे शक्तीप्रदर्शनही दिसून येत असते. मात्र म्हादईप्रश्नी कन्नडिग स्पष्ट भूमिका मांडत नाहीत.
कन्नड महासंघाचे अध्यक्ष हनुमंतप्पा रेड्डी म्हणाले की, गोव्यात वास्तव्य करुन असलेल्या कन्नडीगांची जन्मभूमी कर्नाटक असली, तरी गोवा कर्मभूमी आहे. कन्नडीगांचे गोमंतकीयांशी चांगले संबंध आहेत. गोमंतकीयांप्रमाणेच गोव्यात वास्तव्य करुन असलेल्या कन्नडिगानांही पाण्याची तेवढीच गरज आहे. भविष्यात पाण्याअभावी कोणाचाही घसा कोरडा पडता कामा नये. गोवा आणि कर्नाटक राज्याने ‘म्हादई’चा गुंता सामंजस्याने सोडवावा.