google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘…आतातरी इव्हेंट मॅनेजमेंट थांबवून आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे’

मडगाव :

पिळर्ण औद्योगीक वसाहतीमधील बर्जर कारखान्याला लागलेली महाभयंकर आग सर्वांचे डोळे उघडणारी ठरली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आतातरी इव्हेंट मॅनेजमेंट थांबवून आपत्ती व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो, परंतु अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारची अपुरी यंत्रणा पूर्णपणे उघड झाली आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.



मागील विधानसभेच्या अधिवेशनात, मी कुंकळ्ळी तसेच गोव्यातील इतर औद्योगीक वसाहतीमधील विविध बेकायदेशीर कारखान्यांकडे होत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दुर्घटनेचा “टाईम बॉम्ब” तयार होत असल्याचे सांगून सरकारला सावध केले होते. पिळर्ण येथील आगीने माझा दावा खरा ठरला असून, अपघातांना आमंत्रण देणाऱ्या व बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या औद्योगिक आस्थापनांबरोबर सरकारची तडजोड करण्याची वृत्ती पुन्हा एकदा उघडकीस आणली आहे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.



काही दिवसांपूर्वी कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात आमोनिया गॅसची गळती झाली होती. सदर गळतीच्या मुळाशी जाण्याची तसदी सरकारने घेतली नाही. माझ्या लिखीत तक्रारीनंतर कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील बेकायदेशीरपणे कार्यरत असलेला एक प्रदुषणकारी कारखाना बंद करण्याची शिफारस गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणद्वारे करण्यात आली. गोवा सरकारचे उद्योग खाते, कारखाने आणि बॉयलर खाते तसेच कामगार विभाग आणि इतर खात्यांचे अधिकारी स्वतःहून सुरक्षा उपायांत हलगर्जी व प्रदुषण करणारे कारखाने यांवर कारवाई करत नाहीत? असा सवाल युरी आलेमाव यांना विचारला आहे.


पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील आगीची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी माझी मागणी आहे. त्याच समितीला गोव्यातील इतर विविध औद्योगिक वसाहतींमधील कारखाने व आस्थापनांकडून नियामक अटींचे पालन आणि कोणत्याही आपत्तीला तोंड देण्याची त्यांची तयारी या संदर्भात परिस्थितीचे मूल्यांकन करण्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

माझ्याकडे विधानसभेतील विविध प्रश्नांची उत्तरे आहेत ज्यावरून असे दिसून येते की गोव्यातील कोणत्याही औद्योगिक वसाहतीमधील कारखाने वा आस्थापनांवर कोणत्याही सरकारी प्राधिकरणाचे पूर्णपणे नियंत्रण नाही. प्रत्येक विभाग एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतो. याचा परिणाम पिळर्ण येथील आगीसारखी आपत्ती आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.


पिळर्ण येथील आगीने राजधानी पणजीवर काळे ढग आणले. प्रत्येक गोमंतकीयांने आता वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रदूषणाच्या काळ्या ढगाखाली जीवन जगण्याचा किंवा आपल्या आरोग्याला हानी पोहोचवणारे सर्व कारखाने आणि व्यवसाय बंद करण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. खूप उशीर होण्याआधी आपण आत्ताच यावर शहाणे झाले पाहिजे, असा इशारा युरी आलेमाव यांनी दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!