
वेर्णा येथील भंगारअड्ड्याला भीषण
गोव्यातील हडफडे येथील नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेची धग अद्यापही शांत झालेली नाही. ‘रोमियो लेन’ क्लबमध्ये लागलेल्या आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ‘सेरेंडिपिटी’ कला महोत्सवाच्या तयारीदरम्यान कला अकादमी परिसरातील सजावटीच्या साहित्याला अचानक आग लागल्याची घटना समोर आली होती. हडफडे दुर्घटनेचे पडसाद उमटत असतानाच आणखी एक आग प्रकरण समोर आल्यानं चिंता वाढली आहे.
दरम्यान, राज्यात आग प्रकरणांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका भंगारअड्ड्याला आज शुक्रवार, १२ डिसेंबर दुपारी अचानक आग लागली. भीषण ज्वाळा आणि काळ्या धुराचा प्रचंड लोट दिसताच परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन ते तीन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. भंगार साहित्याचा मोठा साठा असल्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. ज्वलनशील कचऱ्यामुळे आग अधिकच भडकत असल्याने जवानांना ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सलग घडणाऱ्या या आगीच्या घटनांमुळे औद्योगिक परिसर, सार्वजनिक कार्यक्रमस्थळे आणि मनोरंजन केंद्रांतील अग्निसुरक्षा उपायांची तातडीने पुनरावलोकन करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


