तब्बल ‘इतके’ दिवस चालले ‘Naatu Naatu’चे चित्रीकरण
एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला आहे. बेस्ट ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
‘नाटू नाटू’ हे 2022 मधील सर्वांत हिट गाण्यांपैकी एक आहे. एम. एम. किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं. तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलं आहे. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलं आहे.
प्रेम रक्षितने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. “या गाण्याची कोरिओग्राफी करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. कारण एका स्टारसोबत काम करणं सोपं असतं. त्या सुपरस्टारची स्टाइल आणि कामाची पद्धत आपल्याला माहीत असते. मात्र दोन वेगळ्या स्टाइलच्या कलाकारांना एकाच एनर्जीमध्ये आणणं कठीण होतं”, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. नाटू नाटू या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना दोन महिने लागले. या संपूर्ण गाण्यात त्याने रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसाठी 110 स्टेप्स तयार केले होते.
या गाण्याला शूट करायला 20 दिवस लागले आणि 43 रिटेक्समध्ये शूटिंग पूर्ण करण्यात आली होती. याच वीस दिवसांत कलाकारांनी रिहर्सलसुद्धा केलं होतं. नाटू नाटू या गाण्याची शूटिंग युक्रेनमध्ये झाली होती. सकाळच्या वेळेत रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर हे चित्रपटाच्या सीन्सचं शूटिंग करायचे. पॅकअप झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता दोघं रिहर्सल करायला जायचे. त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत त्यांचं रिहर्सल सुरू असायचं.