CNG-PNG बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने नॅचरल गॅसची किमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नवीन फॉर्म्युल्यानुसार आता नॅचरल गॅसची किंमत भारतीय क्रूड बास्केटच्या किंमतीच्या आधारावर निश्चित केली जाईल.
तर, आत्तापर्यंत देशांतर्गत नॅचरल गॅसची किंमत जगातील चार प्रमुख गॅस ट्रेडिंग हब – हेन्री हब, अल्बेना, नॅशनल बॅलन्सिंग पॉइंट (यूके) आणि रशियन गॅसच्या किमतीच्या आधारे निश्चित केली जात होती. मात्र आता, या निर्णयामुळे येत्या दोन दिवसांत म्हणजेच शनिवारपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होतील. PNG ची किंमत 10 टक्क्यांनी कमी होईल. त्याचवेळी, सीएनजीच्या किमती सुमारे 6 ते 9 टक्क्यांनी कमी होतील.
दुसरीकडे, बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, नॅचरल गॅसच्या किंमती निश्चित करण्याच्या नवीन सूत्राला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
नवीन फॉर्म्युल्यानुसार गॅसची किंमत दर महिन्याला निश्चित केली जाणार आहे. तर जुन्या फॉर्म्युल्यानुसार दर सहा महिन्यांनी गॅसची किंमत होती. याशिवाय, नवीन सूत्रानुसार, गेल्या एक महिन्यातील भारतीय क्रूड बास्केटची किंमत घरगुती नॅचरल गॅसच्या किमतीचा आधार म्हणून घेतली जाईल. तत्पूर्वी, जुन्या सूत्रानुसार, जगातील चारही गॅस ट्रेडिंग केंद्रांच्या मागील एका वर्षाच्या किंमतीची (मूल्य वेटेड किंमत) सरासरी घेतली जाते आणि नंतर ती तीन महिन्यांच्या अंतराने लागू केली जाते.