पणजी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने नेहमीच राजकीय फायद्यासाठी अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीचा वापर केला आहे. मागासवर्गीयांवर असलेले प्रेम सिद्ध करण्याची वेळ भाजप सरकारवर आली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करा आणि अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीवरील तुमचे प्रेम सिद्ध करा, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस जोसेफ वाझ यांनी केली. गोव्याचे राज्यपाल पी. एस.श्रीधरन पिल्लई यांना निवेदन दिल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
जोसेफ वाझ, अॅड. जितेंद्र गावकर, रामकृष्ण जल्मी, मिलाग्रीस फर्नांडिस, क्विटेरिया वाझ, कॉन्स्टँटिनो फालेरो, फातिमा कार्दोजो आणि पास्कोल डायस यांचा समावेश असलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज दोनापावल येथील राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन नवीन संसद भवनाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी मागणी केली.
भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणे ही भारतातील संपूर्ण आदिवासी समुदायासाठी मानवंदना ठरेल. यामुळे भारत सरकारकडून महिलांच्या सन्मानाचा सकारात्मक संदेशही जाईल, असे जोसेफ वाझ यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना नवीन संसद भवनाच्या पायाभरणी समारंभाचे निमंत्रण न देता त्यांचा व भारतीतील अनुसूचित जाती समुदायाचा अपमान केला होता, असे अॅड. जितेंद्र गावकर यांनी सांगितले.
घटनात्मक औचित्य राखणे महत्वाचे असल्याने नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यासाठी सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती करावी. भारताच्या माननीय पंतप्रधानांना उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणे घटनात्मकदृष्ट्या योग्य ठरेल असे कॉंग्रेसने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
आमच्या भावना पंतप्रधान कार्यालय तसेच भारताच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडे मांडाव्यात आणि नवीन संसद भवनाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच करावे असे आठ मागास वर्गीयांनी सही केलेल्या हनिवेदनात नमूद केले आहे.