ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला
ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा किशोर दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. एका कार्यक्रमाला गेलेल्या या कॅबिनेट मंत्र्यावर पोलीस कर्मचाऱ्याने गोळीबार केला. दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ हा हल्ला झाला. येथील गांधी चौकाजवळ पोलिस कर्मचाऱ्याने दास यांच्यावर गोळ्या झाडल्या.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आरोग्यमंत्री नबा दास त्यांच्या कारमधून बाहेर आले तेव्हा एएसआयने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबाराचे कारण समोर आलेले नाही. या घटनेनंतर सत्ताधारी बिजू जनता दलाचे कार्यकर्ते धरणे आंदोलनावर बसले. त्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला आहे.
ओडिशाच्या कॅबिनेट मंत्र्यावर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव गोपाल दास असे असून तो गांधी चौकात ASI म्हणून तैनात होता. एएसआय गोपाल दास यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून नबा दास यांच्यावर 4 ते 5 राउंड फायर केले. गोपाल दास याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. नबा दास यांची प्रकृती गंभीर असून त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात येत आहे.
नाबा किशोर दास हे ओडिशातील झारसुखडा जिल्ह्यातील महत्वाचे नेते आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते, नंतर त्यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री आहेत. दरम्यान, बीजेडीचे वरिष्ठ नेते प्रसन्न आचार्य म्हणाले की, या घटनेने आम्हाला धक्का बसला आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेचा आम्ही निषेध करतो.