मडगाव :
प्रत्येकाचे व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे आणि नागरिकांना त्यांच्या आवडीचे जीवन जगता येणे महत्वाचे आहे. लोकांच्या राहणीमानावर निर्बंध लादणे लोकशाहीत अजिबात बरोबर नाही, असे मत प्रख्यात विचारवंत शशी थरूर यांनी व्यक्त केले.
माजी मुत्सद्दी, लेखक, राजकारणी आणि विचारवंत शशी थरूर यांनी मडगाव येथे नामवंत गोमंतकीयांसोबत संवादात्मक सत्रात आपले विचार मांडले.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, माजी सभापती तोमाजीन कार्दोज, इंजिनीयर अरुण बाबा नायक, डॉ.फ्रान्सिस कुलासो, इंजिनीयर महेंद्र खांडेपारकर, ॲड. सचिन खोलकर, स्तंभलेखक पाचू मेनन, बँकर अवधूत कुडचडकर, कलाकार महेंद्र आल्वारीस, हॉटेलियर सेराफिन कोटा, इंजिनीयर नितांत खोलकर, एस.सोनार, देविका सिक्वेरा, एलिनियो कुलासो, अनंत अग्नी, ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो, इंजिनीयर महेश पै फोंडेकर, पियो परैरा, एम के शेख, सुशीला मेंडिस, आसिफ हुसेन, सुभाष फळदेसाई, चेतन आचार्य आणि इतरांनी संवादात्मक सत्रात भाग घेतला व विचारांचे आदान प्रदान केले.
आम्हाला आमच्या नागरिकांना त्यांचे भारतीय पासपोर्ट कायम ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. जरी परिस्थितीमुळे त्यांना दुसरा पासपोर्ट घ्यावा लागला तरीही भारतीय पासपोर्ट अबाधीत राहिल यासाठी आम्हाला कायदेशीर तोडगा शोधावा लागेल. दुहेरी नागरिकत्वावर मी नक्कीच सकारात्मक बाजू मांडेन असे शशी थरुर यांनी सांगितले.
मला पूर्ण विश्वास आहे की जून 2024 मध्ये देशात सरकार बदलणार आहे. हुकूमशाही शासन फार काळ टिकत नाही. भारतीय सर्वसमावेशक आहेत जे विविध जीवनशैली, संस्कृती, खाद्यपदार्थ इत्यादींचा सहज अंगीकार करतात, असे शशी थरूर म्हणाले.
तुम्हाला असा भारत हवा आहे की जिथे लोक त्यांचे विचार मांडायला मोकळे असतील, त्यांना हवे ते खायला मोकळे असतील, त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालायला व प्रेम व्यक्त करायचे त्यांना स्वातंत्र्य असेल? कि असा भारत हवाय जिथे सत्तेत असलेले सरकार तुमच्या बेडरूममध्ये, तुमच्या स्वयंपाकघरात, तुमच्या तिजोरीत, तुमच्या जेवणाच्या खोलीत नजर ठेवते? आमच्याकडे आता असे सरकार आहे जे प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत आहे, असे शशी थरूर म्हणाले.
गोव्याला अजिबात फायदा होणार नाही अशा तथाकथित विकासासाठी मी पर्यावरणाचा नाश करण्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. लोक कोणत्याही प्रकल्पाच्या विरोधात असतील तर पर्याय शोधणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे शशी थरूर यांनी सांगितले.