पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल
पॅरिस :
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या युरोप दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फ्रान्सची राजधानी पॅरिसला पोहोचले आहेत. ते लवकरच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत. पॅरिसमध्ये पोहोचताच विमानतळावर पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले.
एप्रिलमध्ये फ्रान्सच्या (France) अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर मॅक्रॉन यांच्यासोबत बैठक घेणारे मोदी हे पहिले जागतिक नेते असतील. मॅक्रॉन यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते. मोदींनी सोशल मीडियावरील ट्वीटरवरुन ट्वीट करत म्हटले की, ‘माझे मित्र इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) पुन्हा निवडून आल्याबद्दल अभिनंदन. भारत-फ्रेंच धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी एकत्र काम करणे सुरु ठेवण्यास मी उत्सुक आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत युक्रेन संकटाचे जागतिक आर्थिक परिणाम कमी करण्याबरोबरच युद्धग्रस्त देशात (Ukraine) युद्धविरामावर चर्चा करण्याची अपेक्षा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या भारताच्या आकांक्षेमध्ये फ्रान्स भारताचा पसंतीचा भागीदार कसा राहू शकतो यावरही चर्चा होईल. ते पुढे म्हणाले की, ‘तंत्रज्ञान, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा होऊ शकते.’