मराठी अभिनेत्याने शेअर केला पुण्यातील धक्कादायक व्हिडीओ…
पुणे पोलिसांकडून दोन दिवसांपूर्वी तब्बल ४ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. शहरातील तरुणाई मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचं बोललं जात असतानाच पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली. अशातच पुण्यातील वेताळ टेकडीवर दोन महाविद्यालयीन तरुणींनी अमली पदार्थांचं सेवन केलेला एक व्हिडीओ (ramesh pardeshi video) समोर आला आहे. मराठी दिग्दर्शक व ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेते रमेश परदेशी यांनी हा व्हिडीओ (ramesh pardeshi video) शेअर केला आहे. यात दोन तरुणी नशेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
रमेश परदेशी हा व्हिडीओ शेअर करत म्हणतात, “पुण्याच्या वेताळ टेकडीवर मी धावण्यासाठी (व्यायाम) आलो होतो. यावेळी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या दोन मुली बियर, मद्य आणि नशेचं काहीतरी सामान घेऊन टेकडीच्या एका कोपऱ्यात होत्या. या मुली फक्त पहिल्या वर्षाला आहेत. काल-परवाच आपण पाहिलं की, पुण्यात ४ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलंय आणि आज माझ्यासमोर ही घटना घडतेय. या दोन जणींपैकी दुसरीला काहीच शुद्ध नाहीये. आता मी यांना दवाखान्यात घेऊन जातोय.”
“टेकडीवर वर्षानुवर्षे आम्ही सगळे व्यायामासाठी येतो. पण, आता ही लहान मुलं इथेच येऊन नशा करतात. यांच्या जीवाचं बरं वाईट झालं, तर यांच्या पालकांनी कोणाकडे बघायचं? खरंच खूप वाईट परिस्थिती आहे. मी सुद्धा एक पालक असल्याने मलाही आता या मुलींची अवस्था पाहून वाईट वाटतंय. ४ हजार कोटींचं ड्रग्ज सापडणं ही खूप भयंकर गोष्ट आहे. पब, डिस्कोमध्ये सर्रास असे प्रकार घडतात. तरुणाई नशेच्या आहारी जातेय त्यामुळे यावर आता विचार करण्याची खरंच गरज आहे. या तरुणींच्या तोंडातून फेस येतोय त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.” असं रमेश परदेशी सांगितलं.
दिग्दर्शक रमेश परदेशी सांगतात, “टेकडीवर घडलेल्या घटनेचं गांभीर्य खूप मोठं आहे. त्या मुली बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांना तिकडून आम्ही खाली घेऊन आलो. त्यानंतर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यासाठी त्यांना दाखल केलं. आता त्या दोन्ही मुली एकदम सुखरुप आहेत. त्यापैकी एका मुलीचे पालक देखील याठिकाणी आले आहेत. नशेचं विदारक दृश्य आणि पुणे शहरातील ही सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी आवाहन करेन की, मित्रांनो आपलं आपल्या शहराकडे लक्ष आहे का? आणि नसेल तर द्या. या घटना अशाच सुरू राहिल्या तर पुणे हे संस्कृतीचं किंवा शिक्षणाचं माहेरघर न राहता… ड्रग्ज व इतर अमली पदार्थांचं आगार व्हायला नको. मी पालकांना विनंती करतो की, अशा घटनांसाठी जागरूक राहा. आपली मुलं पैसे कुठे खर्च करतात याकडे लक्ष द्या.”
दरम्यान, “संबंधित व्हिडीओ (ramesh pardeshi video) फक्त पुण्यातील सद्य परिस्थिती दाखवण्यासाठी शेअर केला असून या मुलींची खरी ओळख कुठेही सांगू नये जेणेकरून त्यांना भविष्यात त्रास होणार नाही” अशी विनंती देखील रमेश परदेशी यांनी केली आहे.