‘मरण डोळ्यासमोर होतं…’, हल्ल्यानंतर निखिल वागळे यांनी सांगितला थरार
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पुण्यात राष्ट्रसेवा दलाच्या सभागृहात निर्भय बनो कार्यक्रमाचं आयोजन केलं. ते कार्यक्रमाला आले तेव्हा त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेकदेखील करण्यात आली. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा विरोध झुगारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. या हल्ल्यातून निखील वागळे बचावले. ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांनी कार्यक्रमस्थळी भाषण केलं. यावेळी त्यांनी हल्ला करणाऱ्या सर्व आंदोलकांना आपण माफ केलं, असं वक्तव्य केलं. जोपर्यंत आम्ही जिवंत राहणात तोपर्यंत संघर्ष करणार, असंही निखिल वागळे यावेळी म्हणाले.
निखिल वागळे भाषण करायला आले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर निखिल वागळे आता जिवंत झाल्यासारखं वाटतंय, असं म्हणाले. “शिवाजी महाराजांपासून शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत, सगळी आपली परंपरा आहे. आपली संतांची परंपरा आहे. सर्व आपली परंपरा आहे. ही परंपरा आज खेचून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. मी धक्क्यात होतो, पण आता मी घोषणा झाल्या तेव्हा नॉर्मल झालो. जेव्हा काचा फुटल्या, गाडीच्या मागच्या काचा फुटल्या तेव्हा असीमने माझ्या डोक्याला हात लावला. श्रेया फ्रंट सीटला बसली होती. तिचं आम्ही डोकं खाली केलं म्हणून ती वाचली. जोपर्यंत आमची लोकं वाचतील तोपर्यंत तुमचं काही खरं नाही”, असं मोठं वक्तव्य वागळे यांनी केलं.
“हे खरंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं शहर आहे. पण या शहराचं गेल्या 100 वर्षांपासून असा इतिहास आहे. कलंक तर लावलाच आहे, या शहरात 1942 मध्ये आचार्य अत्रे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न संघाने केला होता, हे लक्षात ठेवा. रामाची भक्ती करतात तो नथुराम कोणत्या शहरातला आहे? तर तो याच शहरातला आहे. आचार्य अत्रे असं म्हणाले होते की, आम्हाला मारणारे मेले. आम्ही जिवंत आहोत. मी एवढंच म्हणतो. तेही जिवंत राहो आणि आम्हीसुद्धा जिवंत राहो. या सर्व हल्लेखोरांना मी माफ केलंय”, असं निखिल वागळे म्हणाले.
“तुम्ही मला मारायला आलात, महात्मा फुले यांना मारायला आले होते तेव्हा त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं होतं. त्यानंतर ते फुले यांच्यासोबत काम करायला लागले होते. मला संधी मिळाली तर या भाजपवाल्यांचंही परिवर्तन करुन टाकेल. तो माझा मार्ग आहे. हा सातवा-आठवा हल्ला आहे. माझ्यावर 1979 साली पहिला हल्ला झाला. तेव्हाही माझ्या गाडीची मागचीच काच फोडली होती. मागून हल्ला केला होता. भेकड लोकांचा हल्ला”, अशी टीका निखिल वागळे यांनी केली.
“सहा हल्ले झाले. सातव्या हल्ल्यातूनही वाचलो. आज हल्ला झाला तेव्हा मी काय बोललो, मरण डोळ्यासमोर होतं. ड्रायव्हर वैभवमुळे आम्ही वाचलो. प्रशांत दादा यांचा मी आभारी आहे. त्यांनी भाजपवाल्यांपासून वाचवलं. जोपर्यंत निखिल वागळे जिवंत आहे, तोपर्यंत फॅसिसमच्या लढाईत आम्ही आघाडीवरच राहणार. तुम्ही मला मारु शकतात. अनेकांना मारलं. तुम्ही कधीही आम्हाला मारु शकतात. आमच्या हातात काही नाही. आमचं हत्यार हे प्रेम आहे. माझ्या मनात एक विश्वास आहे. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला फुले, आंबेडकर किंवा महात्मा गांधी सारखं कुणीतरी वाचवतं. आपल्याला हे लोक मारु शकत नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. ही लढाई साधी नाही. ही फॅसिसम विरोधातील आहे”, असं निखिल वागळे म्हणाले.