
‘निवडणुका येतील-जातील, पण मराठी अस्मिता जपणं महत्त्वाचं’
मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी निवडून आलेल्या मनसे आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत, ही निवडणूक सोपी नव्हती, असे नमूद केले.
“अचाट धनशक्ती आणि सत्तेची ताकद यांच्याविरुद्ध शिवशक्तीची लढाई होती. अशा परिस्थितीतही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिलेली झुंज कौतुकास्पद आहे,” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मनसेला अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत व्यक्त करतानाच, “खचून जाणाऱ्यातले आपण नाही. निवडून आलेले नगरसेवक स्थानिक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यासाठीची लढाई ही दीर्घकालीन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “निवडणुका येतील आणि जातील, पण आपला श्वास मराठी आहे हे विसरायचे नाही. मराठी माणसाला नागवण्याची संधी सत्ताधारी सोडणार नाहीत, त्यामुळे त्याच्या पाठीशी ठाम उभे राहावे लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
निवडणुकीत काय चुकले, काय कमी पडले याचे विश्लेषण पक्षपातळीवर करण्यात येईल, असे सांगत त्यांनी लवकरच संघटनात्मक बांधणीसाठी नव्याने कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. “पुन्हा एकदा नव्याने पक्ष आणि संघटना उभारूया,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.





