माथाडी कामगारांच्यावतीने उद्या बंदचे आवाहन…
मुंबई :
माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत सत्ता
संघर्षामध्ये दुर्लक्ष केले व त्यांची आजतागायत पुर्तता न केल्यामुळे बुधवार दि.०१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने माथाडी कामगारांचा एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारलेला आहे.
माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील व संघटनेच्या इतर पदाधिका-यांनी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांनी या एक दिवसीय लाक्षणिक बंदमध्ये सामील होऊन बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे.
राज्य शासनाच्या कामगार, गृह, पणन, नगरविकास, महसूल व अन्य खात्याअंतर्गत माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, या प्रश्नांची राज्य शासनाने त्वरीत सोडवणुक करावी, अशी माथाडी कामगारांची मागणी असून, गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अनेक वेळा माथाडी कामगारांनी विविध प्रकारची आंदोलने केली. तसेच संबंधित खात्यांच्या अधिका-यांना समक्ष भेटून लेखी निवेदनाव्दारे प्रलंबित मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करुनही त्यांनी या समक्ष आणि मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले. तर शिंदे फडणवीस सरकार मात्र सत्ता टिकविण्याच्या संघर्षात व्यस्त असून, माथाडी कामगारांच्या रास्त समस्या, मागण्यां तसेच न्याय्यहक्क अबाधीत ठेवण्यासाठी माथाडी कामगार करीत असलेल्या संघर्षाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, असे माथाडी कामगारांचे म्हणणे असून, याबाबत माथाडी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
या एक दिवसीय बंद आंदोलनात महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगार सहभागी होणार असून, विविध ठिकाणी सभा व जोरदार निदर्शने करण्यास सज्ज झाले असून, विविध कामगार व व्यापारी संघटनांनीही या लाक्षणिक बंद आंदोलनाला पाठींबा व्यक्त केला असून, जर का लाक्षणिक बंद आंदोलनामुळे सरकारने माथाडी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी त्वरीत पावले उचलली नाहीत तर बेमुदत बंदही पुकारला जाईल, असा इषारा माथाडी कामगारांचे धाडसी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील व इतर पदाधिका-यांनी दिला आहे.