‘इंजिन’ नाही; ‘या’ चिन्हावर ‘मनसे’ लढणार लोकसभा…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (१८ मार्च) दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. राज ठाकरे यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला असला तरी, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘मनसे’ सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासंदर्भा लवकरच मुंबईत घोषणा केली जाऊ शकते.
दरम्यान, मनसे महायुतीत सहभागी झाली तर त्यांना रेल्वेचं इंजिन या त्यांच्या निवडणूक चिन्हाऐवजी महायुतीतल्या एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल, असा प्रस्ताव महायुतीने राज ठाकरे यांना दिला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसेच महायुतीने मनसेला जागावाटपाबाबत निर्णय घेण्यास एक दिवसाची मुदत दिली असल्याचंही केसरकर यांनी सुचवलं.
केसरकर म्हणाले, राज ठाकरे यांचा आग्रह होता की, त्यांना त्यांच्या रेल्वेचं इंजिन या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे. परंतु, युतीचा आग्रह होता की त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांनी युतीतल्या पक्षांपैकी एका पक्षाचं चिन्ह घ्यावं, कारण ते चिन्ह लोकांना माहिती आहे. त्या चिन्हासाठी आम्ही राज्यभर आधीच प्रचार केला आहे. शेवटी याप्रकरणी अंतिम निर्णय अमित शाह यांनी घ्यायचा आहे. त्याबद्दल काय ठरलंय ते मला माहिती नाही. परंतु, आम्ही कुठल्या तरी चांगल्या आणि गोड बातमीच्या प्रतीक्षेत आहोत.
येत्या एखाद्या दिवसात मनसेचा निर्णय आपल्याला कळेल. कारण आमचीसुद्धा संख्या (लोकसभेच्या जागांची संख्या) निश्चित व्हायची आहे. राज ठाकरे किती जागा मागणार, त्यांना किती जागा मिळणार आणि राज्यातल्या ४८ जागांमधून त्या वजा केल्यानंतर इतर जागा बाकीच्या पक्षांच्या वाट्याला येणार. त्यानुसारच आम्हाला आमची संख्या ठरवावी लागेल. आमच्याबरोबर सध्या १३ निवडून आलेले खासदार आहेत. तसेच आमच्याबरोबर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील आहे. त्यांच्याबरोबर सध्या एकच खासदार असला तरी त्यांच्या आमदारांची संख्या खूप मोठी आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात त्यांचे आमदार आहेत तिथे त्यांच्या पक्षाचा मान ठेवला जाईल. त्यानुसारच महायुतीचं संख्याबळ निश्चित होईल.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आम्हा तीन मोठ्या पक्षांसह आमच्या मित्रपक्षांसाठीदेखील जागा सोडायच्या आहेत. त्या सोडल्यानंतर भाजपा किती जागा घेणार, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती घेणार हे निश्चित होईल, असं मला समजलं आहे. या सगळ्या चर्चेत किंवा घडामोडींमध्ये माझा प्रत्यक्ष सहभाग फार कमी होता. त्यामुळे माझ्याकडे फक्त इतकीच माहिती आहे.
…