“मोदींनी कोविड लस तयार केली मग संशोधक गवत…”
मुंबई:
आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा वर्धापन दिन पार पडत आहे. वर्धापन दिनी केलेल्या भाषणातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तुफान टोलेबाजी केली.
यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या एका भाषणातील व्हिडीओही कार्यकर्त्यांना ऐकवला. संबंधित व्हिडीओत देवेंद्र फडणवीस ‘कोविड लस पंतप्रधान मोदींनी तयार केली’ असा दावा करत आहेत. फडणवीसांच्या या दाव्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली.
उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, “काल (रविवार, १८ जून) देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातल्या हास्यजत्रेचा प्रयोग सादर केला. तो व्हिडीओ माझ्याकडे आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतायत, ‘आज आपण सगळे एकत्रित याठिकाणी बसू शकलो, कारण कोविडची लस मोदींनी तयार केली.’ त्यांच्या (देवेंद्र फडणवीस) डोक्यात कुठून व्हायरस घुसलाय, हेच कळत नाही.”
“मोदींनी कोविडची लस तयार केली असेल, तर मग बाकीचे काय गवत उपटत बसले होते का? संशोधक गवत उपटत होते का? हे सगळे अंधभक्त आणि त्यांचे गुरू पाहिल्यानंतर त्यांना खरोखर कोणती लस द्यायला पाहिजे, ते ठरवावं लागेल. त्यांना लस देण्याची गरज आहे. या सगळ्या मानसिक रुग्णांना सपुपदेशनासाठी समीर चौगुलेंच्या दवाखान्यात पाठवलं पाहिजे. हे सगळे अवली आहेत. एकापेक्षा एक अवली आहेत. लवली कुणीच नाही. पण त्यांना हेही सांगायला पाहिजे की, तुम्ही अवली असला तरी जनता आता कावली आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरें टोलेबाजी केली.