google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

अशोक चव्हाण यांचा काँग्रेसचा राजीनामा, भाजपच्या वाटेवर?

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात येतील.

या सगळ्याबाबत अशोक चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण आले आहे. राहुल नार्वेकर यांचा आज वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नार्वेकरांना भेटलो, असे अशोक चव्हाणांकडून सांगण्यात आले. मात्र, आगामी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असा जाणकारांचा होरा आहे. भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. नांदेडच्या राजकीय वर्तुळातही अशोक चव्हाण मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘भावी खासदार’ असा उल्लेख करत अशोक चव्हाणांचे स्टेटस ठेवले आहेत.

अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे. त्यामुळे नांदेड काँग्रेसच्या वर्तुळात कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी मविआचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती. ही शक्यता अखेर खरी ठरताना दिसत आहे.

अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.

अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार का, याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावर फडणवीस यांनी म्हटले की, भाजपसोबत अनेक मोठ्या पक्षांचे नेते येऊ इच्छितात. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या वागणुकीमुळे या नेत्यांची पक्षात घुसमट होत आहे. या नेत्यांना देशातील मुख्य प्रवाहात काम करायचे आहे. पण काँग्रेस नेतृत्त्वाच्या भूमिकेमुळे ते शक्य होत नाही. पण अनेक मोठ्या राजकीय पक्षांचे नेते मोदींच्या नेतृत्वाखाली मुख्य प्रवाहात काम करु इच्छितात. आमच्या संपर्कात कोण, याचा खुलासा लवकरच होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठवाड्यातील काही आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. याशिवाय, मुंबईतील काँग्रेस नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्ष सोडू शकतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभारावर अशोक चव्हाण नाराज असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक चव्हाण हे काल काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी त्यांची देहबोली फारशी चांगली दिसत नव्हती. परवा त्यांनी काँग्रेसच्या जिल्हा स्तरावरील बैठकीला दांडी मारली होती. गेले दोन दिवस अशोक चव्हाण हे दिल्लीत होते. याठिकाणी भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. आज भाजपची राज्यसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल, त्यामध्ये चव्हाणांचे नाव असू शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!