सातारा
नीरा-देवधर योजना कालव्यांसाठी 3976 कोटी निधी
सातारा (महेश पवार) :
नीरा-देवधर योजना कालवे व पोट – पाटांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. दुष्काळी खंडाळा तालुक्याचं हक्काचं पाणी शरद पवार यांनी बारामतीला पळविलं. प्रकल्पांसाठी ज्यांनी आपल्या जमिनी देऊन त्याग केला ती खंडाळा तालुक्यातील जनता पाण्यापासून वंचित राहिली होती. जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारने नीरा देवधर योजनेच्या प्रलंबित कामांसाठी 3976 कोटींच्या निधीला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली. त्यामुळे आमची गेल्या अनेक वर्षाची मागणी पूर्ण होऊन अखेर खंडाळा तालुक्याला न्याय मिळाला, अशी भावना बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवराज कांबळे, शैलेंद्र सावंत आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम जाधव म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून नीरा-देवधर योजनेच्या कालव्यांची कामे प्रलंबित होती. जिल्ह्यातील तत्कालीन नेते मंडळी यांचे हे अपयशच म्हणावे लागेल. आता जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आणि पालकमंत्री शंभूराज देसाई या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे अखेर निरा देवधर योजनेच्या कामांसाठी 3976 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही कामे लवकरच पूर्ण होतील आणि खऱ्या अर्थाने खंडाळा तालुक्याला न्याय मिळणार आहे.
तालुक्यातील 14 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. एवढेच नव्हे तर ज्यांनी पाण्यासाठी संघर्ष केला त्या बाळासाहेब बागवान यांच्या आत्म्याला आता खऱ्या अर्थाने शांती मिळेल असे जाधव यांनी स्पष्ट केले.