आमदार रविंद्र वायकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार रविंद्र वायकर यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वायकर यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रविंद्र वायकर यांची ९ मार्च रोजी भेट झाली होती. त्यावेळी वायकर यांना शिंदे गटातील प्रवेशाविषयी विचारण्यात आले होते. मात्र अद्याप माझा तसा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता वायकर यांनी आज (१० मार्च) खुद्द एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “रविंद्र वायकर यांनी बाळासाहेबांचे खरे विचार जोपासणाऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. गेली ४० ते ५० वर्षे बाळासाहेबांसोबत त्यांनी शिवसेनेचे काम केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळेच शिवसेनेचं काम करतोय. बाळासाहेबांचे विचार पूर्ण राज्यभरात पोहोचवण्याचे काम आपण करतोय. मी पूर्ण वायकर कुटुंबाचे स्वागत करतो. वायकर यांनी मला त्यांच्या मतदारसंघातील समस्या सांगितल्या आहेत,” असे शिंदे म्हणाले.
“गेल्या दीड वर्षांत आपण महायुतीच्या माध्यमातून जे निर्णय घेतले त्याचा परिणाम वायकर यांच्यावर झालेला आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांना शिवसेनेत प्रवेश केला आहे. वायकर यांचं फक्त मतदारसंघापुरतं काम नाही. ते चार वेळा आमदार होते. मंत्री होते, नगरसेवक होते. मुंबई महापालिकेची त्यांना सर्व माहिती आहे. ते मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत,” अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसेच वायकर यांना मी शुभेच्छा देतो. वायकर आणि माझ्यात जो संभ्रम होता, तो दूर झालेला आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले