कला अकादमीच्या स्थापना दिनानिमित्त विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना विशाल पै काकोडे यांनी स्थानिक कलाकारांच्या हितासाठी सक्रिय पाऊले उचलावीत, असे आवाहन केले.
जुलै २०२४ मध्ये कला अकादमीच्या भेटीदरम्यान विरोधी पक्षनेत्यांसोबत कला व संस्कृती खाते, कला अकादमी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच नूतनीकरणासंदर्भातील तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी त्यांनी जागतिक कीर्तीचे ध्वनी अभियंता रॉजर ड्रेगो यांच्याशी संवाद साधला होता, असे पै काकोडे यांनी नमूद केले.
त्या वेळी सविस्तर तपासणी अहवाल तयार करून शासनाला सादर करण्यात येईल, असे आश्वासन विरोधी पक्षनेत्यांनी कलाकारांना दिले होते. हा अहवाल सार्वजनिक केल्यास कला अकादमीच्या रचनात्मक, तांत्रिक व प्रशासकीय भवितव्याबाबत सातत्याने चिंता व्यक्त करणाऱ्या कलाकारांना मोठी मदत होईल, असे विशाल पै काकोडे यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी सासष्टी तालुक्यातील रवींद्र भवन, मडगाव येथील कारभाराकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासकीय कार्यपद्धत आणि संगीत, नृत्य आणि नाट्य अशा सादरीकरण कलांमध्ये नियमित व अधिकृत वर्गांच्या अभावाबाबत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला जाब विचारावा अशी मागणी विशाल पै काकोडे यांनी केली आहे.





