संजीवनी कारखाना ; गिरीश चोडणकरांचे सरकारवर शरसंधान
पणजी :
संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी बुधवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर टीका केली आणि हे सरकार बहुजन विरोधी असल्याचा आरोप केला.
“लोकसभा निवडणूक जवळ असल्याने भाजप नेते फक्त ‘संख्या’ सांगत आहेत आणि चुकीची माहिती पसरवून मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना योजना देण्याचे आणि त्यांच्या हिताचे काम करण्याबाबतही भाजप नेते बोलतात. तथापि, गोव्यात शेतकऱ्यांना कोणतीही आशा उरलेली नाही आणि म्हणून त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडले जात आहे,” अशे चोडणकर म्हणाले.
’‘2017 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनोहर पर्रीकर यांनी संजीवनी साखर कारखान्यात ऊसाची जोड उत्पादने घेऊन कारखान्याला नवीन जीवन देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्या आश्वासनाचं काय झालं? शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याऐवजी याच सरकारने 2020 मध्ये कारखाना बंद केला आणि तेव्हापासून राज्यात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत,” असे चोडणकर म्हणाले.
“भाजप सरकार बहुजनविरोधी आहे हे त्यांनी कारखाना बंद करून सिद्ध केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस शेजारील राज्यांना विकण्याची सुविधा देण्यात येणार असे सांगण्यात आले होते, मात त्यातही हे सरकार अपयशी ठरले. ज्यांनी या शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधला त्यांनी त्यांच्या उत्पादनाला कमी किंमत देऊन त्यांची लूट केली आहे. पण सरकारने याबाबत त्यांना मदत केली नाही,” असे चोडणकर म्हणाले.
“मदतीचा हात देण्याऐवजी, गेल्या वर्षी शेकडो शेतकऱ्यांनी कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली तेव्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले. हे अस्वीकार्य आह,” असे ते म्हणाले.
“संजीवनी कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आणि इथेनॉल प्लांट उभारण्यासाठी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’च्या तपशीलाबाबतही सरकारने स्पष्ट केले पाहिजे. हा प्रकल्प उभा करण्यासाठी इच्छूक असलेल्या व्यक्तीकडून कुणीही ‘सूटकेस’ मागितली असल्यास प्रमोद सावंत यांनी चौकशी करावी,” असे चोडणकर म्हणाले.
‘‘ऊस लागवडीवर अवलंबून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांचा या सरकारने छळा केला आहे. त्याचा मी निषेध करतो. सरकारने ताबडतोब कारखाना सुरू करावा किंवा राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यात अपयशी ठरल्याचे जाहीर करावे,” असे चोडणकर म्हणाले.