काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नव्या पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असलेले, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी “३७० कलम पुन्हा लागू करणं माझा अजेंडा नाही.” असं म्हटलं आहे. “तीन वर्षांपूर्वी केंद्राने रद्द केलेले कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे मी वचन देत नाही.” असं आझाद म्हणाले आहेत. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला शहरातील डाक बंगला येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी गुलाम नबी आझाद म्हणाले की, “कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी लोकसभेत सुमारे ३५० आणि राज्यसभेत १७५ मतांची आवश्यकता असेल. ही अशी संख्या आहे की जी कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही आणि मिळण्याची शक्यता देखील नाही. काँग्रेसला ५० पेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत आणि जर ते कलम ३७० बहाल करण्याची चर्चा करत असतील तर ती खोटी आश्वासने देत आहेत.”
याचबरोबर, गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, “मी नवीन राजकीय अजेंड्यात कलम ३७० पुन्हा बहाल करण्याचे आश्वासन दिलेले नाही, कारण खोटे आश्वासन देण्यावर माझा विश्वास नाही. त्याऐवजी, राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देणे, स्थानिक लोकांसाठी जमीन आणि नोकऱ्या ही साध्य करता येणारी उद्दिष्टे आहेत.”
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता गुलाम नबी आझाद कोणतं पाऊल उलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. मागील काही दिवसांपासून ते जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आयोजित सभेत त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता आझाद त्यांचा नव्या पक्षाची घोषणा कधी करणार याची सगळ्यांना उत्सुकता असताना, आजच (११ सप्टेंबर) बारामुल्ला येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना आझाद यांनी येत्या दहा दिवसांमध्ये नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले आहे. जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या सूचनेनुसार पक्षाचे नाव दिले जाईल, असे ते म्हणाले आहेत.