कोटीतील एक घटना ; ‘त्याने’ ठेवले कन्येचेच ‘सरला’ नाव…
चित्रपट अनेकानेक कारणांनी महत्त्वाचा असतो. चित्रपटातून मनोरंजन होतंच, पण चित्रपट विचार देतो, नव्या कल्पना देतो, जगण्याची उमेद देतो, प्रेरणा देतो. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सरला एक कोटी या चित्रपटाच्या बाबतीत एक अनोखी घटना घडली आहे. हा चित्रपट पाहून भारावलेल्या एका प्रेक्षकानं चित्रपटातील नायिकेच्या नावावरून प्रेरित होऊन आपल्या नवजात मुलीचं नावही सरला ठेवलं आहे.
सानवी प्रॉडक्शन हाऊसनं सरला एक कोटी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. नितीन सिंधु विजय सुपेकर यांचं लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात ईशा केसकर, ओंकार भोजने, छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण अशी दमदार स्टारकास्ट आहे. चित्रपटगृहात हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे, तसंच समीक्षकांनीही चित्रपटाचं कौतुक केलं आहे. मात्र चित्रपटाचं कौतुक करणारी अनोखी गोष्ट नुकतीच समोर आली.
बीड जिल्ह्यातील अशोक तपसे यांना नुकतंच कन्यारत्न प्राप्त झालं. ‘सरला एक कोटी’ चित्रपट पाहून ते भारावून गेले. चित्रपटातील नायिकेच्या नावावरू त्यांनी आपल्या लेकीचं नाव चक्क सरला ठेवलं. चित्रपटाच्या टीमसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सरला एक कोटी या चित्रपटाने आणखी एक सरला जन्माला घातली. अतिशय आनंददायी अशी ही घटना असल्याचं दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी सांगितलं.