शासकीय कार्यालय म्हणजे नेत्यांच्या कार्यकर्त्यांची दुकाने बनलेत का?
सातारा (प्रतिनिधी) :
सोमवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शासकीय धान्य पुरवठा करणाऱ्या फिरोज पठाण नावाच्या ठेकेदाराने अरेरावीची भाषा करत केंद्र सरकारच्या अन्न विभागाचे मुख्य प्रबंधक आशुतोष सिंग यांच्यावर आपली भाईगिरी दाखवली. खरंतर यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना शासकीय कार्यालयात दमदाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी का ? गुन्हा दाखल केला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेमुळे शासकीय कार्यालयात काम करणारे अधिकारी हे एकतर दाबाखाली काम करत आहेत असं म्हणायचं का ? की अधिकार्यांची अशा लोकांच्या बरोबर अर्थीक देवानघेवान असल्यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांने तक्रार करण्याची धमक दाखवली नाही का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयात आणि परिसरात काही राजकीय नेते मंडळींच्या कार्यकर्त्यांची अधिकार्यांच्या पेक्षा जास्त उपस्थिती दिसून येते. यामुळे सातारा शहरातील मुख्य शासकीय कार्यालये ही काही राजकीय नेते मंडळींच्या कार्यकर्त्यांची दुकानं बनलीयत का ?असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे जिल्हाधिकारी नेमकी काय भूमिका घेणार याकडे जिल्हावासियाचे लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे हीच मंडळी लोकसेवेचा समाजसेवेचा आव आणून शासकीय कार्यालयात अधिकारी वर्गावर अश्या पध्दतीने अरेरावीची भाषा करुन नक्की कोणती संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत ? यामुळे अशा प्रवृत्तीच्या बंदोबस्त होणे गरजेचे असल्याचे सामान्य नागरिकांचे मत आहे.