सातारा ( प्रतिनिधी ) :
सध्या शिवसेनेसाठी पडझडीचा काळ असला तरी पक्षाला पुन्हा पालवी फुटेल. गेल्या दहा वर्षापासून मी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांसाठी संघर्ष केला. माझे काम व निष्ठा पाहून पक्षाने कोरेगाव आणि माण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर दिली असून भविष्यात पाणी प्रश्न, औद्योगिक वसाहतीसाठी लढा उभारणार अशी ग्वाही शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रताप जाधव यांनी सातारा येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, शिवसेनेचे हैबत बाबा नलावडे, दिनेश बर्गे, गणेश रसाळ उपस्थित होते.
प्रताप जाधव पुढे म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून गेले दहा वर्ष मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करीत होतो. पक्षाच्या माध्यमातून आंदोलने करून खटाव- माण तालुक्यासाठी जे कठापूर ही अत्यंत महत्त्वाची पाणी योजना मार्गी लावण्यात यश आले. गेले काही महिने राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता सध्या शिवसेनेसाठी पडझडीचा काळ आहे. मात्र जे पक्षाचे खरेच निष्ठावान होते ते कार्यकर्ते आजही शिवसेनेबरोबर आहेत. मातोश्रीशी अढळ नाळ जोडले गेलेले आज अनेक जण पक्षाबरोबर आहेत. भविष्यात गावठी ते शिवसेना शाखा काढण्यावर आपला अधिक भर राहणार आहे. खटाव- माण तालुक्यात औद्योगिक वसाहतीसह पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपला अधिक भर राहील.
नरेंद्र पाटील म्हणाले, महाराष्ट्र सारखेच भाजपाने अनेक ठिकाणी षड्यंत्र केली. शिवसेनेने ज्याला कारभारी केला होता, तोच निघून गेला. सरकारी यंत्रणांचा वापर करून शिवसेनेला संपवण्याचे कटकारस्थान सुरू आहे मात्र शिवसेना नेहमीच लोकशाहीच्या रक्षणासाठी बांधील राहील. महेश शिंदे हे ३ वर्षापासून भाजपचे काम करत होते. नंतर ते शिवसेनेत आले. शंभूराज देसाई यांचा स्वतःचा गट आहे. पुरुषोत्तम जाधव म्हणजे शिवसेना नव्हे. त्यांची कोणीही दखल घेत नाही. शिवसेनेत असताना जाधव यांच्या पॅन्टला आंदोलनाचे किती चिकन लागले? असा उलट प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. चंद्रकांत जाधव यांना शिंदे गटात महत्त्वाची पद मिळणार असल्याची चर्चा आहे ही बाब नरेंद्र पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच बहुतेक जाधव यांना राज्यपाल केले जाईल, अशी मिश्किल टिपणी यांनी केली.