नागालँडच्या ‘या’ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा…
२ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा भूकंप झाला. कारण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह या दोहोंवर दावा सांगितला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या सगळ्या घडामोडी घडल्या आणि राष्ट्रवादीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. या गटाला दिलासा देणारा आणि शरद पवारांना झटका ठरणारी एक बाब आता समोर आली आहे.
नागालँडच्या राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. सात आमदार त्यांचे पदाधिकारी हे सगळे अजित पवारांना पाठिंबा देणार हे नक्की झालं आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. नागालँडचे प्रदेशाध्यक्ष वानथुंग यांनी दिल्लीत येऊन प्रफुल्ल पटेल यांची आणि महाराष्ट्रात येऊन सुनील तटकरेंची भेट घेतली. त्यानंतर या निर्णयाची माहिती देण्यात आली. शरद पवारांसमोर पक्ष बांधणीचं आव्हान आहे अशात नागालँडचे सात आमदार अजित पवार गटात आल्याने त्यांना आता आणखी तयारी करावी लागणार किंवा अजित पवार गटाला ‘आशीर्वाद’ द्यावा लागणार आहे.
प्रफुल्ल पटेल यांना आम्ही राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्याचं आश्वासन दिलं आहे वानथुंग यांनी म्हटलं आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रजमोहन श्रीवास्तव यांनी पत्रक या निर्णयानंतर जारी केलं आहे त्यात त्यांनी त्यांनी म्हटलं आहे की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागालँडने हा निर्णय घेतला आहे की इथले सगळे आमदार आणि पदाधिकारी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना पाठिंबा देतील. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करु.’ असा उल्लेख या पत्रकात आहे. नागालँडच्या सात आमदारांनी घेतलेला हा निर्णय शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातो आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळीही त्यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत नागालँडचाही उल्लेख केला होता. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपासह युती केली आहे हे उदाहरण त्यांनी दिलं होतं.