
‘तुम्हाला रेल्वेने निवडून दिले की जनतेने?’
‘तुम्हाला रेल्वेने निवडून आणले की आरोशी, वेळसाव, कासावली या गावातील लोकांनी, ते आधी सांगा. तसेच अंडरपासच्या नावाखाली लोकांना लॉलीपॉप देण्याचा प्रकार थांबवा. आम्हाला रेल्वे दुपदरीकरण नको’ असे खडे बोल आरोशी गावकऱ्यांनी कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांना सुनावले.
आमदार वाझ आज शनिवारी आरोशी येथे गेले असता ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. रेल्वे विकास निगमच्या कंत्राटदाराने स्थानिकांना विश्वासात न घेता आरोशी येथे रेल्वेमार्गाखालील लहान पुलाखाली गुरुवारी काम सुरू केले.
तेथील पावसाचे पाणी वाहून नेणारे पाईप कापले. त्यानंतर तेथे सिमेंट कॉंक्रीट घालण्यास सुरूवात केली. याबाबतची माहिती मिळताच आज शेकडो आरोशीवासीय तेथे जमा झाले. त्यांनी या कामाला कडाकडू विरोध केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थ आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले.
दरम्यान, आमदार वाझ आज या कामाची पाहणी करण्यासाठी आरोशी येथे गेले असता ग्रामस्थ एकवटले. तसेच अंडरपास आणि बॉक्स कल्व्हर्टच्या प्रश्नावरून ग्रामस्थ दोन गटांत विभागले गेले.
वेळसाव येथील विरोधानंतर आरोशी येथील लोकांनी रेल्वे विकास निगमच्या कामाला विरोध दर्शविला व आमदारांवर प्रश्नांचा भडिमार केला. शेवटी आमदार वाझ यांनी यावर योग्य तोडगा काढू असे आश्वासन आरोशीवासीयांना दिले. त्यामुळे लोक शांत झाले.