मडगावमध्ये “सोपो माफिया” सक्रिय : प्रभव नायक यांचा आरोप
मडगाव : शहरातील व्यावसायिकांना लक्ष्य करून ‘सोपो’च्या नावाखाली बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचा आरोप ‘मडगावचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे. ही वसुली मडगाव नगरपालिकेच्या संरक्षणाखाली सुरू असून, यामागे स्थानिक प्रशासनाचा आश्रय असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
मालवाहू वाहनांकडून सर्रास पैसे उकळले जात असून, हा प्रकार सरळ लूटमारीसारखाच असल्याचे नायक यांनी म्हटले आहे. किरकोळ दुकानात माल उतरवण्यासाठी आलेल्या एका वाहनाकडून १५० रुपये आकारण्यात आल्याची पावती दाखवत, या वसुलीची कायदेशीरता काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
व्यापारी वर्ग आधीच व्यापार परवाना शुल्क, विविध कर भरत आहे. तसेच मालवाहू वाहनांकडूनही रस्ता कर आणि परिवहन विभागाचे इतर शुल्क आकारले जातात. अशा परिस्थितीत ‘सोपो’च्या नावाखाली अतिरिक्त आकारणी करणे अन्यायकारक व अस्वीकार्य असल्याचे नायक यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित वसुलीचा कायदेशीर आधार स्पष्ट करावा आणि व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या मुद्द्यावर ‘मडगावचो आवाज’ व्यापाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवेल, असेही नायक यांनी नमूद केले.

