सरकार स्थापनेच्या पाठिंब्याबद्दल ‘काय’ बोलले चंद्राबाबू?
लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल काल जाहीर झाला. मागच्या दोन लोकसभा निवडणुकींपेक्षा हा निकाल पूर्णपणे वेगळा आहे. यात जिंकणारा असमाधानी आहे, तर पराभूत होणार समाधानी आहे. देशातील जनतेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमताचा कौल दिलेला नाही. निश्चित भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यांचे सर्वाधिक 240 खासदार निवडून आले आहेत. पण स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून ते 32 जागा दूर आहेत. पुन्हा सरकार बनवण्यासाठी त्यांना मित्र पक्षांची मदत लागणार आहे. 10 वर्षानंतर देशात पुन्हा आघाडी सरकारचा काळ सुरु होतोय. आता खऱ्याअर्थाने हे NDA चे सरकार असेल.
याआधी दोन टर्मच्या सरकारमध्ये भाजपाचाच वर्चस्व होतं. पण आता त्यांना बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशमधील तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांची मदत लागणार आहे. हे दोन्ही पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. काल रात्रीच लोकसभा निवडणूक निकालाच चित्र स्पष्ट झाल्यानंतर देशात जेडीयूचे नितीश कुमार आणि टीडीपीचे चंद्राबाबू नायडू यांची चर्चा सुरु झाली आहे. या दोन्ही नेत्यांना प्रचंड डिमांड आली आहे. काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडी सुद्धा त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. कारण या दोन पक्षांच्या टेकूवरच मोदींच केंद्रातल नवीन 3.0 सरकार टिकून राहणार आहे. दरम्यान चंद्राबाबू नायडू यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना होताना मीडियाशी संवाद साधला.
“तुम्हाला नेहमीच बातम्या हव्या असतात. मी हा अनुभव घेतलाय आणि देशात अनेक बदल पाहिले आहेत. मी NDA मध्ये आहे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी चाललो आहे” असं चंद्राबाबू नायडू म्हणाले. लोकसभेसोबत आंध्र प्रदेशात विधानसभेच्याही निवडणुका झाल्या. राज्यात सुद्धा टीडीपीच सरकार येणार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचे 16 आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूचे 12 खासदार आहेत.