‘कलाकारांच्या मानधनात होणार कालानुरूप वाढ’
पणजी :
पश्चिम विभागीय सांस्कृतिक कला केंद्रातर्फे देण्यात येणारा अडीच लाखांचा कोमल कोठारी पुरस्कार आता एकापेक्षा जास्त व्यक्तींना दिल्यास विभागला जाणार नाही. दोन कलाकारांना हा सन्मान दिल्यास दोघांनाही अडीच लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा
राजस्थानचे राज्यपाल आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष कलराज मिश्रा यांनी रविवारी गोव्यात झालेल्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या गव्हर्निंग कौन्सिल आणि कार्यकारी परिषदेच्या संयुक्त बैठकीत केली.
कलाकारांना वर्षानुवर्षे दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करण्याच्या सूचना देतानाच या संदर्भातील प्रस्तावालाही त्यांनी यावेळी मान्यता दिली. 2023 मध्ये गोव्यात नॉर्थ ईस्ट ऑक्टेव्ह फेस्टिव्हल आयोजित करेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. ईशान्येतील कलाकारांच्या कलेच्या संवर्धनासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
बैठकीत राज्यपाल मिश्रा यांनी पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्रांतर्गत पारंपारिक आणि लुप्त होत चाललेल्या आदिवासी कलांच्या विविध कलाप्रकारांचे जतन, दस्तऐवजीकरण आणि जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी गांभीर्याने काम करण्याच्या सूचना दिल्या.
केंद्राच्या अंतर्गत राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण दीव, दादरा नगर हवेली येथील लोक, पारंपारिक आणि आदिवासी कला प्रकारांचे संवर्धन, कलाकारांच्या परस्पर देवाणघेवाणीच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला.
एका राज्यातून दुसर्या राज्यात आयोजन उपक्रम वाढवण्याबरोबरच सांस्कृतिक मैत्री वाढवण्यावर त्यांनी भर दिला. नामवंत कलाकारांचे अनुभव आणि योगदान यावर लेखनाच्या प्रकल्पांवरही काम व्हायला हवे, असे ते म्हणाले.
तत्पूर्वी पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका किरण सोनी गुप्ता यांनी केंद्राच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृती विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, राज्यपालांचे प्रधान सचिव सुबीर कुमार, प्रधान अधिकारी गोविंदराम जैस्वाल हेही या बैठकीला उपस्थित होते. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त सचिव अमिता साराभाई यांनी ऑनलाइन बैठकीत भाग घेतला. केंद्रातील राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशातील सदस्य राज्यांतील नियामक मंडळ आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी गोव्यातून प्रा. रामराव वाघ, ज्योती कुंकळकर, देविदास आमोणकर या सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला.