तारांकीत प्रश्नाला मिळाले नाही वेळेवर उत्तर ; युरींचे विधानसभा सचिवांना पत्र
पणजी:
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज गोवा विधानसभेच्या सचिवांना एक लेखी पत्र सादर केले ज्यात त्यांनी आपल्या तारांकित प्रश्न 12 अ चे उत्तर सोमवार 27 मार्च 2023 रोजी अधिकृत संकेतस्थळावर त्याच दिवशी रात्री 8.10 पर्यंत उपलब्ध केले नव्हते हे सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावे दिले आहेत.
काल प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला त्यावेळी विधिमंडळ कामकाज मंत्री नीलेश काब्राल यांनी सदर प्रश्नाचे उत्तर शनिवारी 25 मार्च 2023 रोजीच अपलोड केले गेले होते असा दावा केला होता. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभा संकेतस्थळाची प्रिंट-स्क्रीन आपल्या पत्रासोबत जोडून त्यावर उत्तर उपलब्ध नव्हते ती वेळ व तारीख विधानसभा सचिवांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
सदर संकेत स्थळावर “तारांकित प्रश्न क्रमांक 12 अ व्हॉल्युमिनस असल्याने सीडी सभागृहाच्या टेबलवर ठेवलेले आहे” असे नमूद करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
विरोधी पक्षनेत्याने सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या माझ्या तारांकित प्रश्न क्रमांक 12A च्या उत्तराकडे मी तुमचे लक्ष वेधत आहे ज्याचे उत्तर 27/03/2023 रोजी दिले जाणार होते. गोवा विधानसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम 42 नुसार या प्रश्नाच्या उत्तरासाठी निश्चित केलेल्या बैठकीच्या 2 दिवस आधी मला माझ्या वरील प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते असे नमूद केले आहे.
मी गोवा विधानसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम 290 अंतर्गत “पॉइंट ऑफ ऑर्डर” अंतर्गत मुद्दा उपस्थित केला आणि तो माननीय सभापतींच्या निदर्शनास आणून दिला आणि सदर तारांकीत प्रश्न क्रमांक 12अ पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी केली. मी त्यांना गोवा विधानसभेच्या अधिकृत संकेतस्थळावर संबंधित उत्तराची प्रिंट स्क्रीन देखील दाखवली ज्यात उत्तर अपलोड न केलेली तारीख आणि वेळ दर्शविली होती असे म्हटले आहे.
विधानसभा सभागृहात तारांकित प्रश्न क्रमांक 12अ चे उत्तर शनिवार 25/03/2023 रोजी अपलोड केले गेले होते असे जरी मला सांगण्यात आले तरी प्रत्यक्षात सोमवार 27/03/2023 रोजी रात्री 8.10 वाजेपर्यंत ते उत्तर अपलोड केलेले नव्हते. मला उत्तराची या सीडी सोमवार 27/03/2023 रोजी सकाळी 11:30 वाजता माझ्या टेबलवर ठेवण्यात आली तेव्हा मिळाली असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी आपले म्हणणे सभापतीपर्यंत पोचवावे व योग्य कारवाई करावी अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.