
पणजी:
सजग नागरिक आणि राजकीय विश्लेषक विशाल पै काकोडे यांनी गोवा विधिमंडळ सचिवांना पत्र लिहून, विधानसभेत ‘कॉलींग अटेंशन’ प्रक्रियेचा अयोग्य वापर झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. ७ जुलै २०२५ रोजी लिहिलेल्या अधिकृत पत्रात, त्यांनी २५ मार्च २०२५ रोजी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारियो मिरांडा यांच्या सन्मानार्थ संग्रहालय स्थापन करण्याची मागणी करत सादर केलेल्या ‘कॉलींग अटेंशन’चा संदर्भ दिला आहे.
मारियो मिरांडांचे सांस्कृतिक योगदान उल्लेखनीय असल्याचे मान्य करत, विशाल पै काकोडे यांनी नमूद केले आहे की, विरोधी पक्षनेत्यांची मागणी गोवा विधानसभेच्या कार्यपद्धती व नियम पुस्तिकेतील नियम ६३ नुसार “तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांत” मोडत नाही.
त्यांनी स्पष्ट केले की, विधानसभेचा वेळ आणि संसाधने केवळ तातडीच्या आणि जनहिताच्या विषयांवर खर्च व्हावीत, आणि प्रतीकात्मक मागण्या, जसे की संग्रहालय स्थापनेची मागणी, या अर्थसंकल्पीय किंवा पुरवणी मागण्यांच्या चर्चेत मांडल्या जाव्यात, ‘कॉलींग अटेंशन’सारख्या तातडीच्या विषयांसाठी असलेल्या प्रक्रियेचा वापर करून नव्हे.
गोव्याच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक मान्यवर कलाकारांनी मोलाचे योगदान दिले आहे, याची आठवण करून देत, त्यांनी सुचवले की अशा सर्व कलावंतांचा सन्मान करणारे सर्वसमावेशक ‘आर्ट अँड कल्चर सेंटर’ उभारले जावे. एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता सर्व महान गोमंतकीय कलाकारांचा सन्मान व्हावा असे विशाल पै काकोडे यांनी म्हटले आहे.
या पत्रात लक्षवेधी सुचनेचा प्रस्ताव स्वीकारताना अधिक काटेकोरपणे छाननी व्हावी, यासाठी विधीमंडळ सचिवांकडे विनंती करण्यात आली आहे. तसेच, ८ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आपले पत्र मांडले जावे, अशी मागणीही विशाल पै काकोडे यांनी केली आहे.
एका जबाबदार नागरीकांने लिहीलेले पत्र विधानसभेच्या कार्यपद्धतीत आवश्यक शिस्त व प्राधान्यक्रम कायम ठेवण्याची गरज अधोरेखित करणारी आहे.