गोवा

सत्तेच्या मोहाने ‘त्यांच्या’साठी ‘विषारी’ कोळसा ‘गोड’ झाला का? : प्रभव नायक

मडगाव : मडगावच्या जनतेचा विश्वासघात करून सत्ता मिळवलेल्या मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यावर मडगांवचो आवाजने जोरदार टीका केली आहे. भारतीय रेल्वेनेच डबल ट्रॅकिंग कोळसा वाहतुकीसाठी असल्याचे कबूल केले असताना, दिगंबर कामत मात्र गप्प बसले आहेत. दिगंबर कामत यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी जोरदार मागणी प्रभव नायक यांनी केली आहे.


आमदार दिगंबर कामत यांच्या भूतकाळातील वक्तव्यांची आठवण करून देत प्रभव नायक यांनी एक चित्रफीत जारी केली असून, “२०२० मध्ये गोमंतकीय कोळसा आणि डबल ट्रॅकिंगविरोधात रस्त्यावर उतरले होते तेव्हा दिगंबर कामत मोठ्या गर्जना करत होते. कोळसा म्हणजे विष असे ते सांगत होते आणि गोव्याच्या पर्यावरणाचे व लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणारे नेते म्हणून स्वतःला मिरवत होते. पण २०२२ च्या निवडणुकीनंतर मडगावच्या जनादेशाचा विश्वासघात करून आता मंत्रीपद भोगताना त्यांचा तो आवाज आता गप्प झाला आहे,” असा दावा प्रभव नायक यांनी केला आहे.


दिगंबर कामतांच्या भूमिकेवर टीका करताना प्रभव नायक यांनी सांगितले, “आज भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे की डबल ट्रॅकिंग हा प्रकल्प कोळसा वाहतुकीसाठी आहे. आता दिगंबर कामत यांनी मडगाव व गोव्याच्या जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांना अजूनही कोळसा विष वाटतो का? की सत्तेच्या मोहाने तोच कोळसा आता गोड झाला आहे?” असा खोचक सवाल प्रभव नायक यांनी विचारला आहे.


प्रभव नायक पुढे म्हणाले, “ज्या व्यक्तिने कधीकाळी कोळसा विष असल्याचे सांगितले तोच आज सत्तेत राहण्यासाठी आपले शब्द गिळतो आहे. यावरून स्पष्ट होते की दिगंबर कामत यांची भूमिका कधीही गोव्याच्या हिताची नव्हती, ती फक्त त्याच्या राजकीय फायद्यासाठी होती,” असे प्रभव नायक म्हणाले.

गोव्यासमोरील धोक्याबाबत इशारा देताना प्रभव नायक म्हणाले, “कोळसा वाहतूक व डबल ट्रॅकिंगमुळे गोव्याच्या पर्यावरण, आरोग्य आणि वारशाला अपरिवर्तनीय हानी होईल. दिगंबर कामतांसारखा जो नेता एकेकाळी जनतेसोबत घोषणाबाजी करत होता आणि आज गप्प बसतो, त्याच्याकडून गोव्याच्या हिताचे रक्षण करण्याची अपेक्षाच धरणे चुकीचे आहे,” असे प्रभव नायक म्हणाले.


“मडगावच्या नागरिकांनी दिगंबर कामतांचा हा विश्वासघात लक्षात ठेवावा. जे नेते जनतेच्या भविष्याचा सौदा करून सत्तेत रमले आहेत त्यांची गोव्यास गरज नाही. गोव्याला धैर्यवान आवाजाची गरज आहे, दिल्लीसमोर नतमस्तक होणाऱ्या पक्षबदलुंची नव्हे. आगामी निवडणुकीत गोमंतकीयांचे रक्षण करणारे नेते निवडणे गरजेचे आहे,” असे प्रभव नायक यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!