गोवा

‘निष्क्रियतेच्या स्मारका’वर ‘मडगांवचो आवाज’तर्फे पुष्पचक्र अर्पण

मडगांव : १५ सप्टेंबर २०१५ रोजी मडगाव मल्टिस्टोरीड पार्किंग कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन समारंभ पार पडला. परंतू, दहा वर्षांनंतर सदर प्रकल्पाची एकही वीट बसवली गेली नाही, आणि मडगांवमधील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठीचा हा तथाकथीत प्रकल्प आज निष्क्रियतेचे स्मारक आणि आमदार तथा मंत्री दिगंबर कामत यांच्या अकार्यक्षमतेचे प्रतीक ठरल्याचे सांगत, आज शिलान्यासाच्या १० व्या वर्धापन दिनी आम्ही या प्रतीकावर पुष्पचक्र अर्पण करून निषेध व्यक्त केला,” असे मडगावचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी सांगितले.


मडगांवकरांना वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येतून दिलासा मिळेल असे आश्वासन या प्रकल्पाद्वारे देण्यात आले होते, परंतु त्याऐवजी गेल्या दहा वर्षांत फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकीचा अनुभव मडगावकरांना आला. प्रकल्पाच्या जागी आज बकाल अवस्थेत असलेली जागा म्हणजे मडगांवकरांना दिलेल्या खोट्या आश्वासनाचे ज्वलंत उदाहरण आहे, असे प्रभव नायक म्हणाले.


त्यांनी पुढे सांगितले की, आमदार तथा मंत्री दिगंबर कामत यांनी नेहमीच मडगावची फसवणूक केली असून विकासाच्या केवळ बाता मारल्या आहेत. प्रभव नायक यांनी नमूद केले की शहराला दिलासा देणारा प्रकल्प आज फक्त पोकळ आश्वासनांचे प्रतीक ठरला आहे.


प्रभव नायक यांनी निदर्शनास आणून दिले की सदर प्रकल्प चालीस लावण्यास दरवर्षी येणारे अपयश हे स्थानीक आमदाराच्या निष्क्रियतेचा व अकार्यक्षमतेचा उघड पुरावा आहे. मल्टिस्टोरीड पार्किंग कॉम्प्लेक्स आज अकार्यक्षमतेचे स्मारक बनले आहे, जिथे जनतेच्या अपेक्षा शिलान्यासाच्या दगडाखाली गाडल्या गेल्या आहेत.


मडगावचो आवाज लोकांना अशा खोट्या व फसव्या आश्वासनांची आठवण करून देत राहील. आमचा हा लढा फक्त पार्किंग प्रकल्पाबाबत नसून, वारंवार निवडून येवुनही अपयशी ठरलेल्या लोक प्रतिनिधींना जबाबदार धरण्याबाबत आहे, असे प्रभव नायक म्हणाले.


आज सदर प्रकल्पाच्या शिलान्यास नामफलकावर पुष्पचक्र अर्पण करून मडगांवचो आवाजाने एक ठाम संदेश दिला आहे. मडगावचे तरुण यापुढे निष्क्रियता आणि अकार्यक्षमतेचे मूक साक्षीदार राहणार नाहीत. मडगावकराना हव्या असलेल्या पायाभूत सुवीधा देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असा दावा प्रभव नायक यांनी केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!