
‘टीसीएस ग्रामीण आयटी क्विझ’च्या २६व्या पर्वाचे उद्घाटन
सल्ला व व्यवसाय उपाययोजना या क्षेत्रांतील जागतिक आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (बीएसई: 532540, एनएसई: TCS) आणि कर्नाटक सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स, आयटी व बायोटेक्नॉलॉजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टीसीएस ग्रामीण आयटी क्विझ’च्या २६व्या पर्वासाठी नोंदणी सुरू झाली आहे.
‘बंगळुरू टेक समिट २०२५’चा एक भाग म्हणून ही स्पर्धा आयोजित केली जात असून तिच्यामध्ये ऑनलाइन चाचण्या, व्हर्च्युअल व प्रत्यक्ष क्विझ फेऱ्या अशा मिश्र पद्धतीचा समावेश आहे. देशभरातील आठवी ते बारावीतील ग्रामीण व लहान शहरांमधील विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. मात्र, नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या शाळांना या स्पर्धेसाठी प्रवेश दिला जाणार नाही.
तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांतील वापर, तंत्रज्ञानाचे वातावरण, व्यवसायातील बदल, विविध व्यक्तिमत्त्वे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व क्लाउड कॉम्प्युटिंगसारख्या नव्या कार्यपद्धती या विषयांवरील प्रश्न या क्विझमध्ये विचारले जातील. त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाचा ज्या क्षेत्रांवर प्रभाव पडलेला आहे, अशा बँकिंग, शिक्षण, मनोरंजन, रोबोटिक्स, साहित्य, मल्टिमीडिया, संगीत, चित्रपट, इंटरनेट, जाहिरात, क्रीडा, गेमिंग, सामाजिक माध्यमे इत्यादी क्षेत्रांतील माहितीवर आधारीत प्रश्नही या क्विझमध्ये असतील.
देशभरात या क्विझच्या आठ प्रादेशिक अंतिम फेऱ्या होणार असून त्यातील विजेते नोव्हेंबर २०२५ मध्ये बंगळुरूत होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. सर्व प्रादेशिक विजेत्यांना १०,००० रुपये आणि उपविजेत्यांना ७,००० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर्स दिले जातील. राष्ट्रीय स्तरावरील विजेत्याला १ लाख रुपये आणि उपविजेत्याला ५० हजार रुपयांची टीसीएस शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल. नोंदणीसाठी अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२५ असून विद्यार्थ्यांनी https://iur.ls/tcsruralitquiz2025reg या संकेतस्थळावर अर्ज करावा.
मागील वर्षी या क्विझमध्ये देशभरातील २८ राज्ये व चार केंद्रशासित प्रदेशांतील तब्बल ५.६ लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

