सिनेनामा 

‘या’ दरम्यान होणार पणजीत १५ वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव

पणजी (प्रतिनिधी)
गेल्या पंधरा वर्षांपासून दर्जेदार मराठी चित्रपटांचा गौरव करणाऱ्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची १५ वी आवृत्ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विन्सन वर्ल्डतर्फे आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव गेल्या दीड दशकात गोव्यातील महत्त्वाच्या सांस्कृतिक उपक्रमांपैकी एक दर्जेदार उपक्रम ठरला आहे.   यावर्षी सदर चित्रपट महोत्सव  ७ ते ९ ऑगस्टदरम्यान पणजी येथील आयनॉक्स आणि मॅकेनिज पॅलेस येथे होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. लोकप्रिय अभिनेते संजय दत्त हे उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, असे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


महोत्सवाच्या १५व्या आवृत्तीत समकालीन मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्य आणि समृद्धीचे दर्शन घडविण्यात येणार असून, प्रस्थापित दिग्दर्शक, नवोदित चित्रपटनिर्माते, नामवंत कलाकार आणि गोव्यासह विविध भागांतील चित्रपटप्रेमी एकत्र येणार आहेत. यंदाच्या महोत्सवात कौटुंबिक, विनोदी, सामाजिक आशय असलेले तसेच मानवी भावविश्व उलगडणारे विविध चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविण्यात आलेल्या चित्रपटांसह काही विशेष प्रीमियरही रसिकांना पाहायला मिळणार आहेत.


महोत्सवाचा उद्घाटनाचा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ हा असणार आहे. महेश मांजरेकर स्वतः कलाकार आणि तांत्रिक चमूसह चित्रपटाचे सादरीकरण करणार आहेत. प्रियदर्शिनी इंदलकर, छाया कदम तसेच गोव्यातील अनेक कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संजय शेट्ये यांनी केली असून, या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर महोत्सवात होणार आहे. गोव्यात चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटात स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांचा मोठा सहभाग असून, महिलांच्या सक्षमीकरणाचा विषय यात मांडण्यात आला आहे. गोवा मराठी चित्रपट महोत्सवाशी आपले दीर्घकाळापासूनचे नाते असल्याचे सांगताना महेश मांजरेकर यांनी ‘बंडखोर’ हा चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी निवडला जाणे अत्यंत समर्पक असल्याची भावना व्यक्त केली.



यंदाच्या महोत्सवात अनेक महत्त्वाचे प्रीमियर आणि विशेष स्क्रिनींग होणार आहेत. रोहन कानवडे दिग्दर्शित ‘साबर बोंड’ या चित्रपटाने सनडान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर होणारा पहिला मराठी चित्रपट म्हणून इतिहास रचला असून, त्याला तेथे वर्ल्ड सिनेमा ड्रामाटिक ग्रँड ज्यूरी प्राइज हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय ‘क्रांतिज्योती विद्यालय’, ‘उत्तर’, ‘फस्सक्लास दाभाडे’, ‘तिघी’, ‘तू ती अँड फुजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘मर्दिनी’, ‘भूतम भयम्’, ‘अगं अगं सुनबाई काय म्हणता सासुबाई’ आणि ‘घबाडकुंड’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याचप्रमाणे  ‘पिशवी’ आणि ‘स्नोफ्लॉवर’ या चित्रपटांचे प्रीमियर शो देखील यावेळी होणार आहेत. विविध विषय आणि शैलींचा संगम घडविणाऱ्या या चित्रपटांमुळे रसिकांना समृद्ध चित्रपटानुभव मिळणार असून, समकालीन मराठी चित्रपटसृष्टीतील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास अधोरेखित होणार आहे.


दरम्यान, महोत्सवातील सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षकांची ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष नोंदणी लवकरच सुरू होणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.



‘या’ कलाकारांची असणार आहे विशेष उपस्थिती
दर वर्षीप्रमाणे यंदाही दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, तंत्रज्ञ आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती या चित्रपट महोत्सवाला लाभणार असून, प्रेक्षकांना मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यावर्षी सचिन खेडेकर, रेणुका शहाणे,  मृणाल कुलकर्णी , अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, स्वप्नील जोशी, अनिता दाते, जितेंद्र जोशी, ललित प्रभाकर, निर्मिती सावंत, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके,  प्रार्थना बेहरे, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी आणि मृन्मयी गोडबोले यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

मोहन जोशी यांना प्रदान होणार ‘कृतज्ञता पुरस्कार’
भारतीय रंगभूमी, मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘कृतज्ञता पुरस्कार’  प्रदान करण्यात येणार आहे. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या असून, त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी प्रेक्षकांचा आणि चित्रपटसृष्टीचा मोठा सन्मान मिळविला आहे. उद्योगातील एक ज्येष्ठ आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारे कलाकार म्हणून त्यांच्या कार्याचा अनेक पिढ्यांवर ठसा उमटला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!